विकासाच्या आड अस्वच्छतेचा विळखा

विकासाच्या आड अस्वच्छतेचा विळखा
Published on

विकासाच्या आड अस्वच्छतेचा विळखा
मेट्रो कामाजवळ कचऱ्याचे ढीग

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १६ ः कल्याण-शिळ मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे शहराच्या विकासाला गती मिळत असली, तरी त्याच ठिकाणी कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे. खांब उभारणीसाठी विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र्यांच्या आड काही नागरिकांनी अक्षरशः कचरा टाकण्याचे अड्डेच तयार केले आहेत. शहर स्वच्छतेबाबत कोणतीही जबाबदारी न पाळता उसाची चिपड, मोडकळीस आलेले फर्निचर, प्लॅस्टिक पिशव्या तसेच घरगुती कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे.

कल्याण शिळ रोडवरील टाटा पॉवर लाइन परिसरात ही समस्या अधिक तीव्र झाली असून, पत्र्यांच्या आड मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. मेट्रो कामाच्या ठिकाणी तो कचरा असल्याने तो उचलला गेला नाही. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे दिवसेंदिवस या कचऱ्यात वाढ होत आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असून डास, कीटक वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच येथे काम करणाऱ्या कामगारांनादेखील या दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

एकीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहर स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. शहरातील मोजके प्रभाग आणि मोजके रस्ते या कंपनीकडून साफ केले जातात. यामुळे शहर स्वच्छतेचा दावा पालिका प्रशासन करत असले, तरी प्रत्यक्षात मात्र शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग कायम असल्याचे दिसून येते. स्वच्छता मोहिमा केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीत मोठ्या त्रुटी असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने अशा प्रकारांना आळा बसत नाही. नियम असूनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने निष्काळजी नागरिकांना जणू मोकळे रान मिळाले आहे. परिणामी मेट्रोसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या ठिकाणीच अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, पालिका प्रशासनाने स्वच्छतेच्या कामांवर प्रभावी नियंत्रण ठेवत कंत्राटदार कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करावी, तसेच कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com