एक रुपयांच्या भूभाड्यासाठी ठाण्याला फेऱ्या

एक रुपयांच्या भूभाड्यासाठी ठाण्याला फेऱ्या
Published on

एक रुपयांच्या भूभाड्यासाठी ठाण्याला फेऱ्या
डोंबिवली एमआयडीसी रहिवाशांची ऑनलाइन सुविधेची मागणी

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १६ ः एमआयडीसी निवासी भागातील भूखंडधारकांना दरवर्षी केवळ एक रुपया भूभाडे भरण्यासाठी ठाण्यातील कार्यालयात जावे लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मिलापनगर रेसिडेन्ट्स वेलफेअर असोसिएशनने ऑनलाइन भरणा सुविधा सुरू करण्याची किंवा डोंबिवली एमआयडीसी कार्यालयातच भरण्याची सोय करण्याची मागणी केली आहे.

एमआयडीसीकडून सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वी ९५ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर निवासी भूखंड देण्यात आले होते. या भूखंडांचे वार्षिक भाडे प्रतीवर्ष फक्त एक रुपया आहे. मात्र, हे भाडे भरण्यासाठी रहिवाशांना ठाणे येथील वागळे इस्टेटमधील प्रादेशिक कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागते. विशेष म्हणजे हे भाडे आगाऊ भरता येत नसून दरवर्षी स्वतंत्रपणे भरण्याची अट असल्याने नागरिकांना वारंवार प्रवास करावा लागतो. दरम्यान, बहुतांश भाडेपट्टाधारक आता ज्येष्ठ नागरिक झाले असून, त्यांना प्रवास करणे कठीण होत आहे, तर त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी-व्यवसायामुळे वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत फक्त एक रुपयांच्या भरण्यासाठी रेल्वेतील गर्दी, वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत असल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश दुसाने व इतर सभासदांनी शुक्रवारी (ता. १०) ठाण्यात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेत निवेदन सादर केले. केळकर यांनी तत्काळ एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली.
सदर निवेदनाची प्रत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांनाही देण्यात आली आहे, असे राहिवासी राजू नलावडे यांनी सांगितले. राज्य सरकारच्या डिजिटल पेमेंट धोरणाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीनेही ऑनलाईन सुविधा सुरू करावी, अशी अपेक्षा आता रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com