

वाहतूक नियमांची स्मार्ट उजळणी
पालघर पोलिसांकडून एलईडीतून जनजागृती
बोईसर, ता. १६ (वार्ताहर) : पालघर पोलिसांनी वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी आठ एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून वाहतूक नियमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे.
या उपक्रमांतर्गत पालघर, बोईसर येथे प्रत्येकी दोन, विक्रमगड येथे दोन, तर जव्हार, डहाणू येथे प्रत्येकी एक स्क्रीन बसविण्यात आली आहे. बोईसरमधील एमआयडीसी नाका, बिरसा मुंडा चौक ही महत्त्वाची ठिकाणेही या मोहिमेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या स्क्रीनवर नियम, अपघात प्रतिबंधक सूचना आणि सुरक्षित वाहनचालकतेचे संदेश सातत्याने प्रदर्शित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, हा संपूर्ण उपक्रम शासकीय खर्चातून राबवला आहे. तसेच अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे.