रहस्यांच्या गर्तेत ‘सालबर्डी’चा प्रवास

रहस्यांच्या गर्तेत ‘सालबर्डी’चा प्रवास
Published on

रहस्यांच्या गर्तेत ‘सालबर्डी’चा प्रवास

मुंबई, ता. १६ : महाराष्ट्रातील दुर्गम भागातील सालबर्डी गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा ‘सालबर्डी’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी (ता. १७) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील थरारक प्रात्यक्षिके आणि दमदार अ‍ॅक्शन सीन्स हे ‘सालबर्डी’चे खास आकर्षण असणार आहेत. पोलिस अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेसाठी पूजा सावंतने विशेष मेहनत घेतली असून, पोलिसांची देहबोली, अधिकारपूर्ण संवादशैली आणि शिस्तबद्ध वर्तन यांचा सखोल अभ्यास करीत ही भूमिका साकारली आहे. निर्माते अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांची भक्कम साथ लाभलेला हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘सालबर्डी’च्या कलाकारांनी ‘सकाळ’च्या कार्यालयाला भेट देत संवाद साधला.
‘वर्दी अंगावर चढताच एक वेगळा रुबाब आपोआप येतो. तो वेगळा दाखवावा लागत नाही. वर्दीतच एक ताकद असते. माझी ही भूमिका प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी ठरेल. या चित्रपटात एक वेगळी भूमिका करायला मिळाली, पोलिसांचे आयुष्य फार जवळून पाहायला मिळाले. या चित्रपटात एवढ्या वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करायला मिळणे, हे माझ्यासाठी मोलाचे आहे,’ असे पूजा सावंत हिने सांगितले. चित्रपटाची कथा गूढ घटनांच्या साखळीतून उलगडत जाते. प्रत्येक प्रसंगात दडलेलं रहस्य, अनपेक्षित वळणं आणि अंगावर काटा आणणारे क्षण प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवतात. ‘‘सालबर्डी’ हा केवळ थरारपट नाही, तर मनात प्रश्न निर्माण करणारा, अस्वस्थ करणारा आणि दीर्घकाळ लक्षात राहणारा अनुभव ठरणार आहे,’ असेही तिने सांगितले.
गुल्हर, बाबो, पाणीपुरी यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनंतर ‘सालबर्डी’मधून रमेश चौधरी प्रेक्षकांना एका गूढ आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रवासावर घेऊन जाणार आहेत. ‘मला नेहमीच वेगळ्या कथा सांगायला आवडतात. ‘सालबर्डी’च्या माध्यमातून प्रेक्षकांना अशा एका रहस्यमय प्रवासावर नेण्याचा प्रयत्न आहे, जिथे प्रत्येक क्षणी नवं काहीतरी उलगडत जातं. हा केवळ मनोरंजनासाठीचा चित्रपट नाही, तर विचार करायला भाग पाडणारा आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा अनुभव आहे.’ ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा या चौकटीतून बाहेर येत समाजात घडणाऱ्या अविश्वसनीय घटनांवर लक्ष केंद्रित करीत त्याचा तपास करताना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे,’ असे दिग्दर्शक रमेश चौधरी यांनी सांगितले.
‘चित्रपटाचे चित्रीकरण करताना आम्ही ज्या गावात होतो त्या गावात सतत १० दिवस पाऊस पडत होता. त्यातूनही आम्ही सर्वांनी वाट काढत हे चित्रीकरण पूर्ण केले. या चित्रपटातील पात्र हे खरंतर एका सरपंचाचे आहे. आजकालचे तरुण रक्त त्या सरपंचाला बाजूला करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे तो या सर्व गावातील व्यक्तींना सांभाळून घेत असताना या गावात काही विचित्र घटना घडतात. त्या वेळी एक सरपंच काय भूमिका घेतो, हे या चित्रपटातून दाखवले आहे,’ असे अभिनेते शशांक शेंडे यांनी या वेळी सांगितले.
आपल्या विनोदी भूमिकेने सतत चर्चेत असणारे भारत गणेशपुरे यांनी या चित्रपटात आमदाराची भूमिका साकारली आहे. त्यांनी या भूमिकेबद्दल सांगताना म्हटले, की ‘मी जरी विनोदी भूमिका करीत असलो तरी या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. गावातील घटना पाहताना हा आमदार आपली भूमिका पक्षाच्या बाजूने आणि त्याच्या मतदारसंघाच्या बाजूने सांभाळताना या चित्रपटात दिसत आहे. प्रत्येक राजकारणी ज्या प्रकारे समाजात वावरत असताना अपल्या फायद्याचा विचार करतो, त्याचप्रमाणे त्याने दोन्ही बाजू सांभाळत गावातील अडथळ्यांमध्येही आपला दबदबा कायम ठेवला आहे. या चित्रपटात सर्व विनोदी कलाकार असले तरी हा चित्रपट शेवटपर्यंत सस्पेन्स जपून ठेवणारा आहे,’ असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com