पालघरच्या जिल्हा रुग्णालयाचे अडते घोडे कायम

पालघरच्या जिल्हा रुग्णालयाचे अडते घोडे कायम
Published on

पालघरच्या जिल्हा रुग्णालयाचे अडते घोडे कायम

पालघर, ता. १६ (बातमीदार) : जिल्ह्यातील रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या पालघरच्या जिल्हा रुग्णालयाचे अडते घोडे कायम आहे. या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले असले तरी भौतिक सुविधा आणि आरोग्यविषयक इतर सुविधा नसल्याने अजून काही महिने तरी हे रुग्णालय सुरू होण्याची आशा धूसर झाली आहे. पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी दोन दिवसआधी या रुग्णालयासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीमधून हे पुढे आले आहे.

गेल्या चार-पाच वर्षांपासून रुग्णालयाचे बांधकाम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी गुजरात मुंबईकडे अजूनही आटापिटा करावा लागत आहे. सर्व सुविधायुक्त हे रुग्णालय असले तरी अजूनपर्यंत या रुग्णालयाला पोहोच रस्ता, वीज, पाण्याची व्यवस्था, रुग्णालयाला लागणारे आरोग्यविषयक विविध साहित्य, आरोग्य अधिकारी कर्मचारी उद्वाहन अशा अनेक विविध बाबी पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे रुग्णालय सुरू होण्याला अनेक बाधा निर्माण होत आहेत. या रुग्णालयासाठी मनुष्यबळाची मंजुरी देण्यात आली असली तरी इतर जिल्ह्यांमधील रुग्णालयात अतिरिक्त असलेले कर्मचारी आणि अतिरिक्त साहित्य जिल्हा रुग्णालयाला देण्यात येण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे समजते.

ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराठी यांनी या बैठकीमध्ये दिल्याने पालघर जिल्ह्याचे हे जिल्हा रुग्णालय उसनवारीने चालणार अशी चर्चा आहे. राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांना विशेष मंजुरी मिळाली असली तरी अजून पालघरचे वैद्यकीय महाविद्यालय कागदी प्रस्तावांमध्ये अडकलेले आहे. तांत्रिक मान्यता आणि आराखड्याला मंजुरी मिळाली असली तरी खर्चाची मान्यता मिळाली नसल्याने या महाविद्यालयाचेही भिजत घोंगडे कायम असल्याचे बैठकीतून समोर आले.

रुग्णालयासाठी लागणाऱ्या विजेच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र यंत्रणा असणे आवश्यक असताना सद्यःस्थितीत रुग्णालय सुरू करण्यासाठी नंडोरे येथील गुंडेचा गृहनिर्माण संकुलाकडे असलेला सब स्टेशनवरून ही वीज तात्पुरती घेतली जाणार आहे, तर या रुग्णालयासाठी हजारो लिटर पाण्याची आवश्यकता असताना पडघे आणि २२ गाव योजनेतून सध्या पाणी घेण्याची माहिती पुढे आली. विशेषतः रुग्णालयासाठी अखंडित वीजपुरवठा आणि आवश्यक पाणी यासाठी विशेष प्रयोजन करणे गरजेचे असताना या दोन्ही गोष्टी अजूनही कागदामध्ये गुंतलेले आहेत. विज व्यवस्थेसाठी अजूनही टेंडर झालेले नाही, तर पाण्यासाठी आरक्षण केलेले नाही. त्यामुळे या गोष्टी पावसाळ्यापर्यंत तरी पूर्ण होतील का, असा सवाल बैठकीतून पुढे आला.

या बैठकीला आमदार राजेंद्र गावित यांच्यासह अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण विभाग, वैद्यकीय महाविद्यालयाचे नव्याने रुजू झालेले अधिष्ठाता अशा विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

या रुग्णालयाचे बांधकाम केलेल्या ठेकेदाराला अजूनही काम केलेल्या बिलाची रक्कम देण्यात आलेली नाही. निधीच देणार नाही, तर काम करणार कसे असा सवाल या ठेकेदाराने भर बैठकीत उपस्थित केला. या वेळी राजेंद्र गावित यांनी ठेकेदाराला शांत केले. तसेच उद्वाहनासाठी प्रशासकीय पातळीवरून संथ कारभार सुरू असल्याचे ठेकेदाराने आमदार गावित यांच्या निदर्शनास आणून दिले. सर्व अधिकारी वर्गाकडून रुग्णालयाची माहिती घेतल्यानंतर महावितरणने शॉर्ट टेंडर करून लवकरात लवकर वीज यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न करण्याची सूचना गावित यांनी केली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com