

मुरबाड, ता. १६ (वार्ताहर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानातून समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची शिकवण मिळते. प्रत्येक नागरिकाला हक्कांसोबत कर्तव्यांचीही जाणीव असावी. त्यामुळे प्रत्येकाने सखोल व व्यापक वाचनाची सवय जोपासली पाहिजे. वाचाल तर वाचाल; तरच जीवनात खरोखर मोठे व्हाल, असे प्रतिपादन प्राचार्य तथा रंगकर्मी आनंद जाधव यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त म्हसा येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत विचारमंथनात्मक प्रश्न उपस्थित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पायल घरत, स्नेहा घरत, केतकी घरत, खुशी आराख, मंथन घरत आणि प्रणय पवार या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. विज्ञान शिक्षक महेंद्र पष्टे, धनश्री साबळे; तसेच क्रीडा शिक्षक भानुदास लोहार यांनीही प्रबोधनपर विचार मांडले. सर्व महिला शिक्षकांनी सामूहिक गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन महेंद्र बेद्रे यांनी केले. या वेळी प्रा. सुनीता निपूर्ते, शालिनी चौधरी, सुरेखा कराळे, अनिता कारोटे, रमा पष्टे, प्रा. जगन्नाथ कथोरे, रणजितसिंग कच्छावा, श्रीकांत दुगाडे, प्रशांत परते, विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.