सुस्थितीत जेटीच्या दुरुस्तीसाठी २.०६ कोटींचा घाट?

सुस्थितीत जेटीच्या दुरुस्तीसाठी २.०६ कोटींचा घाट?
Published on

सुस्थितीत जेट्टीच्या दुरुस्तीसाठी कोटींचा खर्च
जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण अधिक गरजेचे, स्थानिकांचा आक्षेप
श्रीवर्धन, ता. १६ : म्हसळा तालुक्यातील संदेरी परिसरातील सुस्थितीत असलेल्या जेट्टीच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून तब्बल दोन कोटी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या निर्णयावर स्थानिक नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. जेट्टी आजही वापरण्यायोग्य आणि भक्कम अवस्थेत असताना एवढ्या मोठ्या निधीची आवश्यकता काय, असा सवाल उपस्थित होत आहे. जेट्टीकडे जाणारा रस्ता मातीचा असल्यामुळे त्याचे डांबरीकरण करण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सदर जेट्टी जुनी असली तरी सध्या चांगल्या स्थितीत आहे. मात्र, जेट्टीकडे जाणारा मुख्य रस्ता सुमारे एक किलोमीटरपर्यंत कच्चा व मातीचा असून, पावसाळ्यात तो पूर्णतः चिखलमय होतो. त्यामुळे जेट्टीपर्यंत पोहोचणेही कठीण बनते. अशा परिस्थितीत प्राथमिक सुविधा दुर्लक्षित ठेवून जेट्टीच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्याचा निर्णय नागरिकांच्या समजण्यापलीकडचा ठरत आहे.
याशिवाय, संबंधित जेट्टी संदेरी गावाच्या हद्दीत असल्याचे कागदोपत्री दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात ती गडदाव गावाच्या हद्दीत येत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. यामुळे कामाच्या ठिकाणाबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, मेरिटाइम विभागातील अधिकाऱ्यांकडून या प्रस्तावाबाबत स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने संशय अधिकच बळावत आहे.

चौकट
निधी मंजुरीत पारदर्शकतेचा अभाव?
या संपूर्ण प्रकरणात निधी मंजुरीची प्रक्रिया, प्रत्यक्ष गरज आणि प्राधान्यक्रम याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जेट्टीच्या तुलनेत रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने नियोजनातील विसंगती स्पष्ट दिसून येते. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाने तातडीने यावर स्पष्टीकरण देणे आवश्यक बनले आहे.

प्रशासनाने प्रत्यक्ष गरजांचा अभ्यास न करता कागदोपत्री प्रस्तावांना मंजुरी देणे थांबवावे. जेट्टी दुरुस्तीच्या नावाखाली निधी लाटण्याचा हा प्रकार असल्याचा संशय निर्माण होतो. सत्ताधारी पक्ष यावर राजकारण करत विरोधकांवर विकासात अडथळा आणल्याचा आरोप करतील. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. प्रशासनाला खरोखरच या भागाचा विकास साधायचा असेल, तर जेट्टीसाठी मंजूर झालेला निधी मुख्य महामार्ग ते जेट्टीदरम्यानचा एक किलोमीटरचा रस्ता पक्का करण्यासाठी वळवावा. त्यामुळे स्थानिक नागरिकांना, मच्छीमारांना आणि आपत्कालीन सेवांना मोठा दिलासा मिळेल.
- अझहर धनसे, राष्टवादी काँग्रेस पक्ष, विधानसभा अध्यक्ष, श्रीवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com