धोकादायक वाहतुकीविरोधात धाडसत्र

धोकादायक वाहतुकीविरोधात धाडसत्र
Published on

ठाणे शहर, ता. १६ (बातमीदार) : अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने कंबर कसली आहे. धोकादायक पद्धतीने होणारी वाहतूक रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. एसटी महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन विभागाने हातात हात घालून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सहा वायू वेग पथके तयार केली असून ही पथके जिल्हाभर गस्त घालत आहेत. एसटी आगारांपासून २०० मीटरपर्यंत नो पार्किंग झोनची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार आहे.

कल्याण-मुरबाड मार्गावर झालेल्या अपघाताची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली असून प्रादेशिक परिवहन विभागाला वायू वेगाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने एसटी महामंडळाला सोबत घेऊन प्रवाशांची गर्दी असलेल्या ठिकाणी धाडी मारून अवैध वाहतूक करणाऱ्यांना लक्ष्य केले आहे. ग्रामीण भागात, तसेच रेल्वे स्थानक येथील गर्दीची ठिकाणे, स्थानके, बाजारपेठा आदी परिसरात ही पथके गस्त घालत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील हद्दीच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पथके कारवाया करणार आहेत. यासोबतच परिवहनमंत्र्यांच्या आदेशाने ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने निरीक्षण करून कोणत्या भागात प्रवाशांच्या फेऱ्या वाढवणे आवश्यक आहे, याचा रोडमॅप एसटी महामंडळाला सादर केला आहे. परिवहन विभागाच्या मते सूचित केलेल्या ठिकाणी एसटी बसच्या फेऱ्या वाढवल्या, तर प्रवाशांच्या अवैध वाहतुकीला खीळ बसेल. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक विभाग आणि त्यांच्या वायू वेग पथकातील अधिकाऱ्यांच्या निरीक्षणातून जिल्ह्यातील अवैध आणि धोकादायक वाहतुकीचे मार्ग निवडून त्या मार्गांवर एसटीने फेऱ्यांमध्ये वाढ करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

वर्षभरात आरटीओची अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई
१,७४१

अपघातप्रवण क्षेत्रांवर विशेष लक्ष
ठाणे-नाशिक महामार्गावर असलेल्या अपघातप्रवण ठिकाणी विशेष लक्ष दिले जाणार आहे. कसारा घाटातील ब्रेक फाॅइल पॉइंटवर ग्रस्त पथक नजर ठेवून असणार आहे. वायू वेग पथकाच्या पाहणीत आढळून आलेले नवे अपघातप्रवण प्रवासी वाहतुकीच्या ठिकाणांचा शोध घेतला जाणार आहे.

तपासणी केलेली ठिकाणे
ठाणे रेल्वे स्थानक ते वर्सोवा, अंबाडी नाका, शेलार, आणगाव, भिवंडी बस स्थानक, कल्याण बायपास, पंडित नाका, शहापूर, शहापूर बस स्थानक, किन्हवली बस स्थानक, वंदना बस स्थानक ते विटावा, शेणवा नाका

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाची वायू वेग पथके अवैध प्रवासी वाहतुकीवर सतत कारवाया करत असतात; मात्र मुरबाड येथील अपघातानंतर अशा कारवाईला अधिक गती देण्यात आली आहे.
- हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी सुचवलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या ठिकाणांवर पथके पाठवण्यात येत आहेत. एसटी महामंडळाला आवश्यक ठिकाणी एसटी बसच्या फेऱ्या वाढवण्याकरिता पत्र देण्यात आले आहे.
- रोहित काटकर, उपप्रादेशिक अधिकारी, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com