

वाशी, ता. १६ (बातमीदार) : झोपडपट्टीच्या पुनर्विकासाबाबत नवी मुंबईतील भाजपच्या दोन्ही आमदारांमध्ये मतभेद आहेत. शिवसेनेकडे एमआयडीसीचे खाते असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून पुनर्विकासाचा घाट घातल्याची अफवा नवी मुंबईतील भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. एमआयडीसीच्या जागेवरील झोपडपट्टीचा विकास हा क्लस्टर योजनेच्या माध्यमातून करण्यात यावा. क्लस्टर योजनेतून घर मिळाल्यास सर्वसामान्यांना मोठ्या आकाराची घरे मिळतील, असा विश्वास शिवसेना उपनेते तथा नवी मुंबई महापालिकेचे उपनेते विजय चौगुले यांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबई महापालिका परिसरातील झोपड्यांचा पुनर्विकास करण्यासाठी सरकारने एसआरएच्या माध्यमातून निविदा काढली आहे. त्याला भाजपच्या नेत्यांनी विरोध केला आहे. एमआयडीसीने स्थानिक प्राधिकरण असणाऱ्या महापालिकेला विश्वासात न घेता ही निविदा काढल्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी संताप व्यक्त करत नवी मुंबईतील झोपडपट्टीधारकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी झोपडपट्टींचा विकास हा क्लस्टर योजनेच्या माध्यमातून करण्यात यावा, अशी मागणी करत, भाजपच्या नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असेल, तर आम्हीदेखील मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा दिला आहे.
विजय चौगले यांनी बुधवारी (ता. १५) झालेल्या पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी एसआरएला पाठिंबा दिला, तर गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये एकमत नसल्याचे चौगुले म्हणाले. या वेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर, नगरसेवक सुरेश कुलकर्णी, सरोज पाटील, अनिकेत म्हात्रे, ममित चौगुले, अॅड. श्वेता काळे, चांदणी चौगुले, शुभम चौगुले, गौरी आंग्रे आदी उपस्थित होते.
जनता दरबारामध्ये गणेश नाईक यांनी आम्ही झोपडपट्टीचा विकास करून देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते झोपडपट्टीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत. नवी मुंबईतील विकासकामे ही सिडको वसाहतीमध्येच होत आहेत, मग झोपडपट्टीसाठी वेगळा न्याय का, असा सवाल चौगुले यांनी व्यक्त केला आहे.
‘नटसम्राट’सारखी रहिवाशांची परिस्थिती
झोपडपट्टीमधील रहिवाशांची गत ‘नटसम्राट’मधील अप्पा बेलवलकर या पात्रासारखी झाली असून ‘कोणी घर देता का घर’ अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. झोपडपट्टींचा पुनर्विकास होत नसल्यामुळे त्यांना चिंचोळ्या घरात राहावे लागत आहे. नवी मुंबईतील भाजपच्या नेत्यांनी त्यांना मोठे घर देऊन त्यांचा विकास करावा. त्यांना झोपडपट्टीमधील शिवसेनेचे नगरसेवक मोठे करायचे नाही. त्यांनी लोकांना घर द्यावे व स्वत: ‘सम्राट’ व्हावे, अशी टीका विजय चौगुले यांनी केली.
महापालिका राज्यातील केंद्रशासित प्रदेश
नवी मुंबई महापालिकेची अवस्था देशातील केंद्रशासित प्रदेशांप्रमाणे झाली आहे. सर्व महापालिकांसाठी असणारे नियम डावलून स्वत:चे वेगळे निर्णय सत्ताधारी घेत आहेत, अशी टीका चौगुले यांनी केली.
कोणालाही बेघर करणार नाही!
क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास केल्यास प्रत्येकाला ३२६ चौरस फुटांचे घर मिळेल, तसेच झोपडपट्टीमधील ज्यांच्या घरांची जागा मोठी आहे, त्यांच्याकडून बांधकामाचा खर्च किंवा रेडीरेकनरच्या दराप्रमाणे घेण्यात येईल. त्याचप्रमाणे दिघा येथील अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांनादेखील घरे देण्यात येतील. ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टरच्या माध्यमातून विकास करण्यासाठी रहिवाशांसाठी सॅम्पल फ्लॅटदेखील बांधण्यात येईल, असे चौगुले म्हणाले.
नवी मुंबईतील झोपडपट्टीचा विकास क्लस्टर योजनेतून करण्याची प्रमुख मागणी असून कोणत्याही झोपडपट्टीधारकाला बेघर होऊ देणार नाही. भाजपच्या काही लोकांकडून बैठका घेऊन अफवा पसरवण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सांगण्यात येणार आहे. तसेच झोपडपट्टी परिसरामध्ये त्यांची सभा घेण्यात येईल.
- विजय चौगुले, विरोधी पक्षनेते, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.