

मनोरंजनाच्या आडून मद्यप्रसार?
रोडपालीतील ‘जनरेशन लार्ज’ कार्यक्रमाला नागरिकांचा विरोध; पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती
सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १६ : कळंबोली रोडपाली येथे २५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘जनरेशन लार्ज’ या संगीत कार्यक्रमावर वादाचे सावट गडद झाले आहे. सुरुवातीला युवकांसाठी मनोरंजन, संगीत आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याचा उद्देश सांगण्यात आला असला, तरी कार्यक्रमाच्या प्रसिद्धी साहित्यामध्ये मद्य ब्रँडचे उघडपणे प्रमोशन होत असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाकडून या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. तरीही कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत संभ्रमाचे वातावरण कायम आहे.
पोस्टर्स, डिजिटल जाहिराती आणि सोशल मीडियावरील प्रचारामध्ये मद्याशी संबंधित ब्रँड्सचे नाव, चिन्ह आणि ‘पॅकेज्ड ड्रिंक’चे उल्लेख ठळकपणे दिसून येत आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ संगीतापुरता मर्यादित नसून अप्रत्यक्षपणे मद्यप्राशनाला प्रोत्साहन देणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः तरुण पिढीला लक्ष्य करून अशा प्रकारे जाहिरात केली जात असल्याने त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक रहिवासी, पालकवर्ग आणि सामाजिक संघटनांनी या कार्यक्रमाला कडाडून विरोध दर्शवला असून, युवकांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाकडून या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. तरीही कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत संभ्रमाचे वातावरण कायम आहे. प्रशासनाने जाहिरातींचे स्वरूप आणि नियमांचे पालन तपासले का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागरिक आणि विविध संघटनांकडून या प्रकरणी तक्रारी दाखल करण्याची तयारी सुरू असून, गरज भासल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. आयोजकांकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नसल्याने वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
चौकट
मद्यप्रसाराबाबत वाढती चिंता
मनोरंजनाच्या माध्यमातून मद्यप्राशनाला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले जात असल्याची भावना समाजात बळावत आहे. युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर अशा कार्यक्रमांविषयी संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
कोट
आजची तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे. अशा पिढीसमोर मद्यसंस्कृतीचे ग्लॅमरायझेशन करणे समाजासाठी घातक आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवले गेले पाहिजे आणि युवकांच्या हितासाठी सकारात्मक, संस्कारक्षम उपक्रमांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.
- रामदास शेवाळे
नगरसेवक पनवेल महापालिका
कोट :
युवकांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी समाजाची आहे. मात्र, ‘जनरेशन लार्ज’सारख्या कार्यक्रमातून अप्रत्यक्षपणे मद्यप्रसार होत असेल, तर ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. मनोरंजनाच्या नावाखाली चुकीचे संदेश दिले जाणे थांबवणे गरजेचे असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ योग्य निर्णय घ्यावा. आम्ही आमच्या शहरांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ देणार नाही.
- सुदाम पाटील
पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.