

तळोजात उघडे फिडर पिलर
आरएमयूही निष्काळजी अवस्थेत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
तळोजा, ता. १६ : तळोजा वसाहतीतील विविध सेक्टरमध्ये वीज वितरण प्रणालीतील फिडर पिलर आणि आरएमयू (रिंग मेन युनिट) उघड्या अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या निष्काळजीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
तळोजा वसाहतीच्या नियोजनादरम्यान अनेक ठिकाणी वीज वितरणासाठी फिडर पिलर आणि आरएमयू यंत्रणा उभारण्यात आली. मात्र, या उपकरणांभोवती आवश्यक सुरक्षा व्यवस्था न केल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी फिडर पिलरचे दरवाजे तुटलेले किंवा कायम उघडे असून, आतील विद्युत यंत्रणा सहजपणे उघड्यावर दिसत आहे. काही ठिकाणी आरएमयूदेखील कोणत्याही संरक्षक कवचाशिवाय उभे असल्याने लहान मुले, नागरिक आणि भटक्या प्राण्यांसाठी धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः उद्याने, मैदाने आणि शाळांच्या आसपास ही उपकरणे असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पावसाळा जवळ येत असल्याने पाणी साचल्यास शॉर्टसर्किट किंवा विद्युत अपघात होण्याची शक्यता वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चौकट
कारवाईची गरज
नागरिकांनी यासंदर्भात सिडको प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, सिडकोच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी फिडर पिलर आणि आरएमयू सामान्यतः उघड्या जागी असतात. मात्र, ते धोकादायक वाटल्यास पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना केली जाईल, असे सांगितले. तरीही, संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
कोट :
उद्यान आणि मैदानात मुले खेळत असतात. सिडकोने फिडर पिलर आणि आरएमयूभोवती मजबूत तार कुंपण उभारून सदर परिसर धोकादायक असल्याचे फलक लावावे.
- प्रवीण दळवी रहिवासी तथा पदाधिकारी मनसे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.