

एस विभागातील प्रलंबित कामांवरून नगरसेवक संतप्त
बैठकीत प्रशासनाला कडक इशारा
मुलुंड, ता. १७ (बातमीदार) : भांडुप परिसरातील मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे एस विभागातील नगरसेवकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत कडक शब्दांत इशारा दिला. भांडुपमधील पालिकेच्या एस वॉर्ड कार्यालयात सहाय्यक आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत रखडलेली विकासकामे, महानगर गॅस जोडणीतील विलंब तसेच पावसाळ्यापूर्वीची अपुरी तयारी या मुद्द्यांवरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करण्यात आली.
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या सूचनेनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, नगरसेविका दिपमाला बढे, राजोल संजय पाटील, ज्योती राजभोज, सुरेश शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. मात्र, बैठकीत समाधानाचा सूर उमटण्याऐवजी प्रशासनाविरोधातील असंतोष अधिक ठळकपणे समोर आला.
भांडुपमधील नव्या इमारतींना अद्याप महानगर गॅस पाइपलाइनची जोडणी न मिळाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. सातत्याने पाठपुरावा करूनही संबंधित यंत्रणेकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे नालेसफाई, गटार दुरुस्ती आणि इतर आवश्यक कामे अपूर्ण असल्याने येत्या पावसाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
दरम्यान, सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि गॅसजोडणी प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ही आश्वासने प्रत्यक्षात उतरली नाहीत, तर प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा नगरसेवकांनी दिला.
मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष
शहरात झपाट्याने वाढणाऱ्या उंच इमारतींना आवश्यक पायाभूत सुविधा मिळत नसल्याचा मुद्दाही या वेळी उपस्थित करण्यात आला. विकासाच्या नावाखाली केवळ बांधकामांना प्राधान्य दिले जात असून, नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.