बेशिस्त रिक्षाचालकांवर आरटीओचा बडगा

बेशिस्त रिक्षाचालकांवर आरटीओचा बडगा
Published on

बेशिस्त रिक्षाचालकांवर आरटीओचा बडगा
वर्षभरात एक हजार ८१५ चालकांवर कारवाई
वाशी, ता. १७ (बातमीदार) ः नवी मुंबईतील बेशिस्त रिक्षाचालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बडगा उगारत वर्षभरात तब्बल एक हजार ८१५ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये एकूण सात हजार ३५३ रिक्षांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी एक हजार ८१५ प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन आढळून आले. तसेच ३१ चालकांचे परवाने निलंबित केले आहेत. या मोहिमेतून आरटीओला ४४ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
आरटीओकडून करण्यात आलेल्या कारवाईत जादा प्रवासी वाहून नेणे, प्रवाशांना भाडे नाकारणे, मीटरपेक्षा अधिक भाडे आकारणे, वाहनाचे इन्शुरन्स व फिटनेस प्रमाणपत्र नसणे, तसेच प्रवाशांशी उध्दट वर्तन करणे अशा विविध कारणांचा समावेश आहे. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान आरटीओच्या पथकाने रिक्षांची कागदपत्रे तपासण्यासोबतच काही अधिकाऱ्यांनी डमी प्रवासी बनूनही तपासणी केली. दोषी आढळलेल्या चालकांवर तत्काळ कारवाई करण्यात आली.

नागरिकांकडून रिक्षाचालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे आम्ही विशेष मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली. पुढील काळातही अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील. रिक्षा सेवा ही शहरातील महत्त्वाची वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे चालकांनी नियमांचे पालन करून प्रवाशांना योग्य सेवा देणे अपेक्षित आहे.
- दत्तात्रय सांगोलकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

बेशिस्त रिक्षाचालकांचे धाबे दणाणले
आरटीओच्या कठोर कारवाईमुळे बेशिस्त रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही चालकांनी कारवाईच्या भीतीने रिक्षा रस्त्यावर न आणण्याचा निर्णय घेतल्याचेही दिसून येत आहे. शहरात बोगस रिक्षा, परवाना नसताना वाहन चालविणे असे प्रकार अधूनमधून समोर येतात. यामुळे अपघाताचा धोका वाढतो तसेच अपघातानंतर दोषी चालकांना शोधणे अवघड होते. नागरिकांकडून अशा बेशिस्त चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती. आरटीओने राबविलेल्या या मोहिमेमुळे रिक्षा व्यवस्थेत शिस्त येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com