

विकासाच्या झगमगाटात पाण्याची तीव्र टंचाई!
पनवेलकरांचा आक्रोश; आंदोलन, पाठपुरावा वाढला तरीही तोडगा अधांतरी, मे महिन्यात परिस्थिती भीषण होण्याची चिन्हे
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १७ ः पनवेल महापालिका हद्दीसह सिडको विकसित करत असलेल्या सर्वच नोड्समध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना क्षेत्रामुळे या परिसराचा कायापालट होत असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी मात्र नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. एप्रिल महिन्यातच परिस्थिती बिकट झाली असून, मे महिन्यात हे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पनवेल, करंजाडे, उलवे, द्रोणागिरी, कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे, खारघर आणि तळोजा-नावडे या भागांत लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या प्रमाणात पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. परिणामी, अनेक भागांत अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणी येणे, तर काही ठिकाणी नळ कोरडे राहण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागरिकांना महागड्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. विविध भागांत मोर्चे, रास्ता रोको, निवेदने आणि आंदोलनांचा सपाटा सुरू असून लोकप्रतिनिधींनाही या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत आहेत.
कामोठे परिसरात मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सिडकोने मोरबे धरणासाठी मोठा निधी खर्च करून ते धरण पालिकेकडे हस्तांतरित केले. त्या बदल्यात सिडको वसाहतींना नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी देणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष होत आहे. तर, कळंबोली आणि नवीन पनवेल परिसरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जलवाहिन्या बदलण्याचे आणि नवीन टाकण्याचे काम सुरू आहे; मात्र या कामाला अनेक अडथळे येत असून जमीन संपादनास ग्रामस्थांकडून विरोध होत आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास मोठा विलंब होत आहे. या गंभीर प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत सिडको प्रशासनाला जाब विचारला आहे. तसेच विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
पनवेल महापालिकेला दरदिवशी २५८ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या २१८ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांचा आढावा
शुक्रवारी (ता. १७) आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेत पाणीपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी महापौर नितीन पाटील उपस्थित होते. जलवाहिन्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला जबाबदारी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्या ठिकाणी अडथळे निर्माण होत आहेत, तेथे त्वरित तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मे महिन्यात भीषण संकटाची शक्यता
सध्याची परिस्थिती पाहता, एप्रिलच्या शेवटी आणि मे महिन्यात पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. पाण्याचे स्रोत मर्यादित असताना पुरवठा वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना झाल्या नाहीत, तर पनवेल परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सिडको आणि महापालिकेसमोर आव्हान
पनवेल परिसरात विकासाचा वेग प्रचंड असला, तरी मूलभूत सुविधांमध्ये विशेषतः पाणीपुरवठ्यात मोठी तफावत दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींचा वाढता पाठपुरावा, आंदोलनांचा दबाव आणि नागरिकांचा संताप लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरले आहे, अन्यथा विकासाच्या नावाखाली तहानलेले शहर अशी ओळख पनवेलला मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.