

एपीएमसीत सेस चोरीवर कारवाई
एका दिवसात दोन लाखांची अतिरिक्त वसुली
तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये शेतमालाच्या व्यवहारात सेस बुडवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे उघड झाल्यानंतर बाजार समिती प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. प्रवेशद्वारांवर विशेष तपासणी मोहीम राबवून सेस चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून, त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ आणि व्यवहारात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे. सध्या आंब्यासह विविध फळांचा हंगाम सुरू असून, शेतमालाची किंमत १० रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत जात असतानाही बाजार समितीला अपेक्षित महसूल मिळत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. यामुळे संशय निर्माण झाल्यानंतर सखोल तपासणीला सुरुवात करण्यात आली.
तपासणीदरम्यान व्यापारी, वाहतूकदार आणि काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने कमी दराचे गेट पास तयार करून महसूल बुडवण्याचा गंभीर प्रकार समोर आला. एका प्रकरणात ११७ कॅरेट आंबा असताना केवळ ७० कॅरेटचा गेट पास तयार करण्यात आला होता. तसेच प्रत्यक्ष बाजारभाव १४० रुपये प्रति किलो असताना तो केवळ ७० रुपये दाखवून सेस कमी भरल्याचेही उघड झाले. या प्रकरणात संबंधित वाहन जप्त करून पंचनामा करण्यात आला असून, संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय, आणखी एका प्रकरणात एका व्यापाऱ्याने एक डझन मालासाठी ५०० रुपयांचे बिल तयार केले होते. मात्र, तपासणीत विसंगती आढळल्यानंतर त्याच्याकडून १००० रुपयांचा सेस वसूल करण्यात आला. जास्त माल देऊन कमी गेट पास तयार करणे, लूज मालाचे वजन कमी दाखवणे, तसेच व्यवहाराची रक्कम मुद्दाम कमी दाखवणे असे विविध प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे उघड झाले आहे.
चौकट
संगनमताने महसूल बुडवण्याचे प्रकार उघड
तपासणीत व्यापारी, वाहतूकदार व काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने गेट पासमध्ये फेरफार करून सेस चोरी केल्याचे स्पष्ट झाले. कमी माल दाखवणे, कमी दर दाखवणे आणि वजनात तफावत ठेवणे या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवला जात होता.
चौकट
कडक कारवाईमुळे महसूल वाढीची चिन्हे
जावक गेटवरील विशेष तपासणीमुळे एका दिवसातच दोन लाख रुपयांची अतिरिक्त वसुली झाली. यामुळे पुढील काळात बाजार समितीचा महसूल वाढण्याची शक्यता असून, प्रामाणिक व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.