

गुरुचरित्र पारायण सोहळा उत्साहात
कळंबोलीत स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त सेवेकऱ्यांचे वाचन
पनवेल, ता. १७ (वार्ताहर) ः कळंबोली येथील स्वामी समर्थ सेवा मंदिरात स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त आयोजित गुरुचरित्र पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ९ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत झालेल्या या पारायणात शेकडो सेवेकऱ्यांनी सामूहिक सहभाग नोंदवत अध्यात्मिक वातावरणाची अनुभूती घेतली. या सोहळ्याचे आयोजन स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
मंडळाचे अध्यात्मिक गुरु संदीप मते यांच्या मार्गदर्शनाखाली पारायण कार्यक्रम शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला. सात दिवस चाललेल्या या पारायणात गुरुचरित्र वाचनासोबत नामस्मरण, भजन आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या पारायण सोहळ्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. स्वामी समर्थ पुण्यतिथी हा दिवस सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी वर्षभर केलेल्या सेवाकार्याचा हिशोब स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा असल्याने भक्तांनी श्रद्धा आणि भक्तिभावाने सहभाग घेतला. पारायणाची सांगता ग्रंथ समाप्तीने करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. या संपूर्ण कार्यक्रमामुळे कळंबोली परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता वाढीस लागते, अशी भावना उपस्थित भक्तांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.