

जुईनगर मैदानासाठीचा लढा यशस्वी
धारण तलाव प्रकल्पाला स्थगिती
नागरिकांचा विरोध, लोकप्रतिनिधींचा दबाव; न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत काम थांबवण्याचा निर्णय
वाशी, ता. १९ (बातमीदार) : जुईनगर सेक्टर २१ येथील बहुउद्देशीय मैदानासाठी आरक्षित भूखंडावर धारण तलाव उभारण्याच्या प्रस्तावाला स्थानिक नागरिकांसह सत्ताधाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर अखेर महापालिकेने या कामाला स्थगिती दिली आहे. विकास आराखड्यात मैदानासाठी आरक्षण असतानाही तलाव उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत होता. महासभेत झालेल्या तीव्र चर्चेनंतर अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले.
मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या जनहित याचिकेचा संदर्भ देत नवी मुंबई महापालिकेने संबंधित भूखंडावरील माती काढण्यासाठी निविदा काढली होती. मात्र, हा भूखंड बहुउद्देशीय मैदानासाठी राखीव असल्याचे निदर्शनास आल्यानंतर निविदा प्रक्रिया थांबवण्यात आली. आरक्षणात नियमबाह्य बदल केल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे.
शुक्रवारी झालेल्या तहकूब महासभेत जुईनगरच्या नगरसेविका डॉ. प्रणाली पाटील यांनी यासंदर्भात ठराव मांडला. माजी महापौर जयवंत सुतार, नगरसेविका माधुरी सुतार आणि इतर सदस्यांनी मैदानाचे आरक्षण कायम ठेवण्याची ठाम भूमिका घेत प्रशासनावर जोरदार टीका केली. नागरिकांना धारण तलावापेक्षा मैदानाची अधिक गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सभागृह नेते सागर नाईक यांनी हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना नव्याने मसुदा तयार करून पालिकेची भूमिका ठामपणे मांडण्याची मागणी केली. तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत कामाला स्थगिती देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्यानुसार महापौर सुजाता पाटील यांनी धारण तलाव प्रकल्पाला स्थगिती जाहीर केली.
दरम्यान, २०१८ ते २०३८ या विकास आराखड्यानुसार या भूखंडाचा काही भाग बहुउद्देशीय मैदानासाठी राखीव आहे. स्थानिक नागरिक येथे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि फेरफटका यासाठी जागेचा वापर करत आहेत. तरीही कंत्राटदारांच्या फायद्यासाठी मैदान हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शिरवणे आणि जुईनगर येथील नागरिकांनी सुमारे ९०० सह्या गोळा करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.
चौकट
मैदानाचे आरक्षण वादाच्या केंद्रस्थानी
विकास आराखड्यात स्पष्टपणे बहुउद्देशीय मैदानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर धारण तलाव उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने वाद निर्माण झाला. स्थानिकांच्या मते, हा बदल नियमबाह्य असून, नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करणारा आहे. मैदान हे परिसरातील एकमेव मोकळे सार्वजनिक ठिकाण असल्याने ते कायम ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांचा दबाव व न्यायालयीन निर्णय निर्णायक
स्थानिक नागरिकांनी सह्यांची मोहीम राबवत प्रशासनावर दबाव वाढवला, तर लोकप्रतिनिधींनीही महासभेत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासनाला कामाला स्थगिती द्यावी लागली. पुढील निर्णय आता न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून असून, अंतिम निकालानंतरच प्रकल्पाबाबत स्पष्टता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.