

सीआरझेडमध्ये टर्फ उभारणी
नेरूळ जेट्टीलगत मॅनग्रोव्ह क्षेत्रात क्रीडा केंद्र; पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध, स्थलांतरित पक्ष्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : नेरूळ जेट्टी परिसरातील मॅनग्रोव्ह बफर झोन आणि सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) क्षेत्रात सुरू असलेल्या फुटबॉल टर्फ उभारणीमुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या भागात व्यावसायिक स्वरूपाचे क्रीडा केंद्र उभारले जात असल्याने ‘विकास विरुद्ध पर्यावरण’ हा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेरूळ जेट्टी परिसरातील जागेचा तृतीय पक्ष करारांद्वारे व्यावसायिक वापरासाठी विकास सुरू असून, त्याअंतर्गत फुटबॉल टर्फचे बहुतांश काम पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. टर्फच्या सभोवती उंच संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या असून, भविष्यात प्रकाशयोजनाही उभारली जाणार असल्याचे समजते; मात्र या उंच जाळ्या आणि तेजस्वी दिव्यांमुळे परिसरातील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी या खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते. विशेषतः रोहित (फ्लेमिंगो) पक्षी येथे थव्याने येऊन वास्तव्यास असतात. पर्यावरणप्रेमींच्या मते, उभारण्यात आलेल्या जाळ्यांना धडक लागून पक्षी जखमी होण्याची शक्यता आहे, तर हॅलोजन दिव्यांच्या तीव्र प्रकाशामुळे पक्षी दिशाभूल होऊन भरकटू शकतात.
यापूर्वीही याच परिसरात उभारलेल्या उंच कमानीला धडक लागून अनेक रोहित पक्षी जखमी झाले होते, तर काहींचा मृत्यूही झाला होता. त्या घटनेनंतर संबंधित संरचना हटवण्यात आली होती; मात्र आता पुन्हा अशाच प्रकारे जाळ्या आणि प्रकाशयोजना उभारून पक्ष्यांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप होत आहे.
‘सेव्ह नवी मुंबई’ संस्थेचे कार्यकर्ते सुनील अग्रवाल यांनी या प्रकल्पावर तीव्र आक्षेप नोंदवत, प्रकल्पासाठी आवश्यक पर्यावरणीय परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, या प्रकरणावर सिडको प्रशासनाने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी वाढत्या विरोधामुळे हा मुद्दा अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.
कोट
मॅनग्रोव्ह बफर झोन आणि सीआरझेड क्षेत्रात फुटबॉल टर्फला आमचा ठाम विरोध आहे. याबाबत आम्ही तहसीलदार तसेच सीआरझेड विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. हा भूखंड सीआरझेडमध्ये असताना तो खासगी क्रीडा संकुलासाठी कसा देण्यात आला, याची चौकशी झाली पाहिजे. सिडकोने हा भूखंड तत्काळ रद्द करावा, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल.
- सुनील अग्रवाल, सेव्ह नवी मुंबई संस्था, कार्यकर्ते
चौकट
पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन?
मॅनग्रोव्ह बफर झोन आणि सीआरझेड क्षेत्रात कोणतेही बांधकाम करताना कठोर पर्यावरणीय नियमांचे पालन बंधनकारक असते. या पार्श्वभूमीवर, संबंधित फुटबॉल टर्फ प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास केवळ जैवविविधतेलाच धोका निर्माण होत नाही, तर भविष्यात अशा संवेदनशील भागांतील अनियंत्रित विकासालाही खतपाणी मिळू शकते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.