

महामंडळाच्या स्वच्छता अभियानाचा फज्जा
कॅन्टीन, पाणी, स्वच्छता, शौचालयाचा अभाव
राजीव डाके, सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. २० : प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानाचा चौथा टप्पा पार पडला असून, ठाणे विभागात मात्र या अभियानाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. आगार आणि स्थानकांमध्ये अस्वच्छता पसरली असून कॅन्टीन, पाणी आणि स्वच्छ शौचालयाचीदेखील येथे व्यवस्था नसल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत दिसून आले आहे.
ठाणे शहरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे तीन आगार आणि एक स्थानक आहे. या ठिकाणाहून हजारोंच्या संख्येने प्रवासी एसटीमधून प्रवास करतात. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या येथून धावतात. त्यामुळे महाराष्ट्रातील विभागांपैकी ठाणे हा महत्त्वाचा विभाग मानला जातो. मात्र या विभागात प्रवाशांना अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. आगार आणि स्थानकांवर स्वच्छतांचा अभाव दिसत असून, सुलभ शौचालयांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. ठाणे आणि वंदना आगार येथे प्रवाशांना भरउन्हात उभे राहावे लागत आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानाचा चौथा टप्पा पार पडला असतानाही एसटी प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर या अभियानावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
------------------------
कॅन्टीनचा अभाव
एसटीच्या सामान्य गरीब प्रवाशांना स्वस्तात चहा-नाश्ता मिळावा याकरिता मंडळाकडून आगारांमध्ये कॅन्टीन सुरू करण्यात आली आहेत. मात्र ठाण्यातील ठाणे स्थानक, वंदना, खोपट क्रमांक १ येथे एकही कॅन्टीन उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. खोपट क्र. २ येथे कॅन्टीन असली तरी त्यात अवघे चार प्रवासीच बसतील एवढी जागा असून, हे कॅन्टीन प्रवासी बसत असलेल्या आगारापासून लांब आणि अडगळीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्याचा प्रवाशांना काहीच उपयोग होत नाही.
--------------
शौचालयांची बिकट अवस्था
खोपट क्र. १ आगारातील शौचालय प्रचंड धोकादायक झाल्याने ते कधीही कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. शौचाला बसण्याचे भांडे तुटले असून, महिलांच्या प्रसाधनगृहातील टाक्यांचा स्लॅब अत्यंत धोकादायक झाला आहे. त्यामुळे शौचास बसणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन बसावे लागते. तसेच ठाणे एसटी आगारात नागरिकांसाठी पाणी पिण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनादेखील जेवल्यानंतर पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. हे आगार ग्रामीण आदिवासी मार्गाशी जोडले असल्याने येथून मोठ्या प्रमाणात गरीब आदिवासी नागरिक प्रवास करीत असतात.
-----------------------
कचऱ्याचे साम्राज्य
खोपट आगार क्र. १ मध्ये अस्वच्छता पसरली असून, अनेक ठिकाणी कचऱ्याचा ढीग जमा झाला आहे. शौचालयाच्या बाजूने झाडेझुडपे आणि कचरा असल्याने साप, विंचवाचा धोका आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.