

घणसोलीत आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या विकासाची मागणी
७८ एकर आरक्षित भूखंडावर तातडीने काम सुरू करण्याची नागरिकांची भूमिका
तुर्भे, ता. २० (बातमीदार) : घणसोली सेक्टर १२, १२अ आणि १३ येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाचा विकास तातडीने करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ, क्रीडा मंडळे आणि नागरिकांकडून करण्यात आली आहे. यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी प्रवीण म्हात्रे, प्रकाश पाटील, रंजना शिंत्रे, अतुल कुलकर्णी, सूर्यकांत मढवी, एकनाथ दुखंडे आदी उपस्थित होते.
सिडको व नवी मुंबई महापालिकेने शासन आदेशानुसार घणसोली नोडमधील सेक्टर १२अ, १२ व १३ येथे एकूण ७८ एकर भूखंड क्रीडा संकुलासाठी आरक्षित केला आहे. त्यापैकी सेक्टर १३ मधील ३६ एकर जागा महापालिकेसाठी, तर सेक्टर १२अ व १२ मधील ४२ एकर क्षेत्र राज्याच्या क्रीडा विभागासाठी राखीव आहे. २०२२ च्या प्रारूप विकास योजनेत या प्रकल्पाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
प्रकल्पासाठी वास्तुविशारद शिवाजीराव पाटील यांनी संपूर्ण आराखडा तयार केला असून सीआरझेडची मान्यता देखील मिळाली आहे. तसेच माजी क्रीडा सहसचिव प्रदीप इंदुलकर यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये मूलभूत क्रीडा सुविधांच्या विकासाचा प्रस्ताव सादर केला आहे.
सेक्टर १२अ व १२ मधील २० एकर भूखंड क्रीडा विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर त्वरित कुंपण घालून ताबा घ्यावा, तसेच सेक्टर १३ मधील ३६ एकर जागेवरही काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ‘खेलो इंडिया’ योजना आणि सीएसआर निधीतून आर्थिक सहाय्य मिळू शकते, असेही नमूद करण्यात आले.
चौकट
क्रीडा संकुलामुळे नवी मुंबईला जागतिक ओळख
भव्य आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारल्यास नवी मुंबईचे नाव जागतिक क्रीडा नकाशावर झळकण्यास मदत होईल. यामुळे स्थानिक खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, नव्या खेळाडूंची जडणघडण होईल आणि स्थानिक व्यवसायालाही चालना मिळेल. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.