

जिल्ह्यात अवैध दारू धंदे जोरात
अवैध दारूविरोधात धडक कारवाई; ८.२५ कोटींचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २० : रायगड जिल्ह्यात गावठी दारूच्या धंद्यांना आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी मोहीम राबवित मागील आर्थिक वर्षात तब्बल आठ कोटी २५ लाख ८४ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान दोन हजार ६९१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन हजार ३७१ जणांना अटक करण्यात आली आहे. तरीही गावठी दारूचे सत्र अद्याप संपलेले नाही. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या कालावधीत येथील गावठी दारूचे धंदे जोरात सुरू आहेत.
रायगड जिल्ह्यात जंगल परिसर, जेथे गोड्या पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत अशा ठिकाणे हे दारू निर्मितीचे धंदे राजरोस सुरू आहेत. विशेषतः रोहा, मुरूड या तालुक्यांत असलेल्या धंद्यांवर आतापर्यंत अनेक वेळा कारवाया झाल्या; परंतु हे अड्डे अद्याप बंद झालेले नाहीत. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना त्या पाण्यावर दारू तयार केली जाते आणि तिची विक्री आणि वाहतूक केली जात असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात विदेशी मद्य, गावठी दारू, दारू निर्मितीसाठी लागणारी रसायने, साहित्य तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १६२ वाहने यांचा समावेश आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने कारवाई होत असली तरी अवैध दारू व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याने हा व्यवसाय थांबण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे केवळ कारवाई न करता पुरवठा साखळी मोडीत काढणे, पुनरावृत्ती करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि संवेदनशील भागांत सतत गस्त वाढविण्याची गरज असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे येथील महिलांनी पाठवलेल्या आहेत.
एकूण जप्त मुद्देमाल : ₹ ८,२५,८४,४३०/-
दाखल गुन्हे : २,६९१
अटक आरोपी : २,३७१
जप्त वाहने : १६२
प्रमुख प्रभावित क्षेत्र : रोहा, मुरूड आणि जंगल भाग.
कारवाईत सातत्य राखणार
गावठी दारूच्या धंद्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. पुढील दोन महिन्यांत अवैध धंद्यांवर पूर्णपणे नियंत्रण आणले जाईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रविकिरण कोल्हे यांनी दिली. पाणीटंचाईच्या कालावधीत पाणवटे दूषित होणे योग्य नाही. या अवैध धंद्यांची माहिती तेथील स्थानिक महिलांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.