

माध्यमांनी महिलांविषयी जबाबदार वार्तांकन करावे!
कार्यशाळेत विजया रहाटकर यांचे प्रतिपादन
मुंबई, ता. २० : माध्यमे ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून, समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती आहेत. महिलांशी संबंधित विषय हाताळताना संवेदनशीलता, जबाबदारी आणि अचूकता आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान’ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, सदस्य सचिव नंदिनी आवडे, वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता, लेखिका रिचा सूद उपस्थित होत्या. रहाटकर म्हणाल्या, की महिलांनी विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, प्रशासन आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने कायम आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांची भूमिका अधिक जबाबदारीची ठरते. महिलांविरोधातील गुन्ह्यांचे वार्तांकन करताना योग्य भाषेचा वापर करावा. पीडितेचा सन्मान आणि ओळख संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असावे. कोणत्याही परिस्थितीत पीडितेची ओळख उघड होता कामा नये.
----
राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी महिलांविषयीचे कायदे, विविध योजना आणि उपक्रमांविषयी महिलांना माहिती असणे आवश्यक असल्याचे म्हटले. वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता यांनी माध्यमांमधील शब्दांतून समाजाची मानसिकता घडते. त्यामुळे पत्रकारितेत लैंगिक संवेदनशीलता आणि जेंडर-न्यूट्रल भाषा वापरणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. लेखिका डॉ. रिचा सूद यांनी महिला अत्याचारांच्या वार्तांकनात पीडितेच्या नावाबाबत खबरदारी बाळगणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
----
बदलांकडे संधी पाहावे
वेगाने बदलणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान महत्त्वाचे बदल घडवत आहे. या बदलांकडे संधी म्हणून पाहात महिला पत्रकारांनी अधिक तंत्रस्नेही व्हावे. या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने महिला पत्रकार पत्रकारितेच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतात, असा विश्वास माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.