

भाजपला उत्तर देण्यास काँग्रेस सज्ज
महिला आरक्षण वाद; जिल्हा पातळीवर पत्रकार परिषदा घेणार
विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : लोकसभा मतदारसंघाची फेररचना तसेच नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत फेटाळल्यानंतर भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या या मोहिमेला जशास तसे उत्तर देण्याचे नियोजन काँग्रेसने आखले असून याअंतर्गत जिल्हा पातळीवर पत्रकार परिषदा घेण्याची तसेच आंदोलन करण्याची तयारी पक्षाने चालवली आहे.
लोकसभा मतदारसंघाची फेररचना व नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेने फेटाळल्यानंतर भाजपने काँग्रेस पक्षाला महिलाविरोधी ठरवण्याची मोहीम सुुरू केली आहे. भाजपच्या या मोहिमेला चोख उत्तर देण्यासाठी काँग्रेसही सज्ज आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. वेणुगोपाल यांनी देशातील सर्व काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना याबाबत पत्र लिहिले आहे. यामध्ये काँग्रेसला महिलाविरोधी ठरवण्याचा भाजपचा अजेंडा हाणून पाडण्यासाठी आक्रमकपणे मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याची झलक आज (ता. २०) मुंबईत खासदार प्रणिती शिंदे आणि शोभा बच्छाव यांच्या पत्रकार परिषेदेतून दिसली.
...
महिला नेत्यांवर जबाबदारी
केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मंगळवारी (ता. २१) ३२ जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदांचे आयोजन केले आहे. काँग्रेस ज्येष्ठ नेत्यांसह खासदार शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर, प्रणिती शिंदे तसेच यशोमती ठाकूर, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखे, श्रद्धा ठाकूर, हुस्नबानो खलिफे, डॉ. श्रुती म्हात्रे यांच्यावर या पत्रकार परिषदांना संबोधित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
...
काय आहेत निर्देश?
१. काँग्रेस नेते, विशेषतः महिला नेत्यांनी जिल्हास्तरावर पत्रकार परिषद घ्या
२. भाजपच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडून जनतेपुढे सत्य मांडा
३. काँग्रेस महिला नेत्या व लोकप्रतिनिधींनी समाज माध्यमांवर मोहीम सुरू करा
४. राज्य आणि जिल्हा पातळीवर आंदोलने करा
...
चर्चेचे खुले आव्हान
महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले; पण अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत त्याचा उल्लेखही नव्हता, असा आरोप खासदार प्रणिती शिंदे व शोभा बच्छाव यांनी केला. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून देशाचे तुकडे पाडायचे होते. हा डाव उधळून लावल्यामुळे सरकार बॅकफूटवर गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेला काँग्रेस तयार आहे, कधी व कुठे यायचे ते सांगा, नरेंद्र मोदींनाही चर्चेला आणा, असे प्रतिआव्हान खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.