‘हाफकिन’च्या खासगीकरणाला विरोध

‘हाफकिन’च्या खासगीकरणाला विरोध
Published on

‘हाफकिन’च्या खासगीकरणाला विरोध
मनसेचे आंदोलन; जुन्या संस्थेला बळकटी देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः १३५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेच्या संभाव्य खासगीकरणाविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत मंगळवारी (ता. २१) संस्थेबाहेर जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात हाफकिनचे कर्मचारीही सहभागी झाले होते.
हाफकिन संस्थेने देश-विदेशात मोठे योगदान दिले असून, पोलिओसारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी १३० हून अधिक देशांना लस पुरवण्याचे काम या संस्थेने केले आहे. तसेच धनुर्वात, डांग्या-खोकला आणि घटसर्प (त्रिगुणी) लसींचे उत्पादनही येथे होत आहे; मात्र हे उत्पादन खासगी कंपन्यांना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
कोविड काळात लसनिर्मितीचे काम खासगी क्षेत्राला देण्यात आले; मात्र हाफकिनसारख्या सक्षम संस्थेला सरकारकडून अपेक्षित मदत मिळाली नाही, अशी टीका या वेळी करण्यात आली. सरकारने व्यावसायिक भागीदारीचा मार्ग स्वीकारण्याऐवजी हाफकिनला सक्षम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेने केली. या आंदोलनाला काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दर्शवला. आंदोलनादरम्यान हाफकिन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांना खासगीकरणाविरोधात निवेदन देण्यात आले.

जनतेने या आंदोलनात सहभागी होणे गरजेचे आहे. हाफकिन ही विश्वासार्ह आणि जुनी संस्था आहे. आजपर्यंत कोणत्याही लसीमुळे गंभीर समस्या उद्भवलेली नाही. सरकारने खासगीकरणाचा निर्णय घेण्याऐवजी संस्थेला निधी दिला असता, तर ही वेळ आली नसती.
- गोविंदराव मोहिते,
अध्यक्ष, हाफकिन बायोफार्मा मान्यताप्राप्त संघटना

हाफकिनमध्ये अनेक गोष्टी छुप्या पद्धतीने सुरू आहेत. एका खासगी कंपनीशी संबंधित व्यक्ती गेल्या महिन्याभरापासून माहिती गोळा करत आहे. संस्थेची औषधे बाहेर महागड्या दरात विकण्याचा डाव आहे. फक्त १५० कोटींचा निधी दिल्यास हाफकिन अधिक सक्षमपणे लसी उत्पादन करू शकते.
- मनोज चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com