

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : उन्हाचे चटके वाढत असताना ठाणेकरांवर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे सावट आले आहे. जांभूळपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीसाठी महापालिका क्षेत्रातील वागळे, मुंब्रा-कळवा परिसरामध्ये गुरुवारी (ता. २३) ते शुक्रवारी (ता. २४) तब्बल २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार असून पाणी साठवणूक आणि नियोजनाचा ताण वाढणार आहे.
ठाणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)मार्फत पुरवठा होणाऱ्या पाणी योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र येथे महत्त्वाच्या दुरुस्ती आणि उन्नतीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. बारवी गुरुत्ववाहिनी क्रमांक एक, दोन आणि तीनवर तातडीची देखभाल व दुरुस्ती केली जाणार असल्याने गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
या शटडाऊनचा थेट परिणाम मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा, तसेच वागळे प्रभाग समितीतील काही भागांवर होणार आहे. विशेषतः दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१चा काही भाग वगळता) आणि कळवा परिसरातील संपूर्ण भागात पाणीपुरवठा ठप्प राहणार आहे. तसेच वागळे प्रभागातील कोलशेत खालचा गाव येथेही २४ तास पाणी येणार नाही.
शटडाऊननंतरही झळ
पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही लगेच सुरळीत सेवा मिळणार नाही. पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याची साठवणूक करून आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
पाण्याची काटकसर करा!
उन्हाळ्याच्या दिवसांत आधीच पाण्याची मागणी वाढलेली असताना अशा प्रकारच्या पाणीकपातीमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहे. घरगुती वापर, व्यवसाय, तसेच लहान उद्योगांनाही या परिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.