

मॉन्सूनपूर्व कामांसाठी कसरत
मजूर मिळत नसल्याने बळीराजा चिंतित
विक्रमगड, ता. २१ (बातमीदार) ः तालुक्यासह परिसरातील जनजीवन वाढत्या तापमानामुळे होरपळून निघत आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा पारा ३५ ते ३७ अंश सेल्सिअसवर असल्याने कडक उन्हामुळे कामावर येण्यास मजूर टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
एप्रिल, मे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. याच काळात बांधबंदिस्ती, राबणी, शेतातील दगडधोंडे काढणे, शेणखत, गाळमाती टाकणे, नाल्यांची दुरुस्ती अशी कामे पूर्ण केली जातात; मात्र यंदा वाढत्या तापमानामुळे कामे ठप्प झाली आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने उष्माघात, चक्कर येणे, शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे मजूर कामावर जाणे टाळत आहेत.
----------------------
पाण्यासाठी वणवण
शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध ठिकाणी कामे सुरू आहेत; मात्र त्या ठिकाणी मजुरांची उपस्थिती कमी असल्याचे दिसून येते. उन्हाच्या तडाख्याने कामाच्या ठिकाणी सावली तसेच पिण्याच्या पाण्याच्या शोधातच अधिक वेळ घालवत असल्याचे चित्र आहे. उन्हाच्या झळांमुळे कामासाठी बाहेर पडलेल्या मजुरांची अवस्था बिकट झाली असून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
----------------------
कडक उन्हात काम करताना उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हामुळे काम करणे अत्यंत कठीण झाले असून, शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो.
- संजय कोरडा, मजूर, विक्रमगड