

अवकाळीने दामखिंडमध्ये उच्चदाब विद्युतवाहिनी कोसळली
कर्जत, ता. २१ (बातमीदार) ः तालुक्याला मंगळवारी (ता. २१) अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यामध्ये दामखिंड-नांगुर्ले-भिलवले रस्त्यावर सकाळी ८ वाजेच्या सुमारास महापारेषणची नागोठणे-पडघा ही ४०० केव्ही उच्चदाब वीजवाहिनी कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दामखिंड-नांगुर्ले-भिलवले रस्त्यावर उच्चदाबाची वीजवाहिनी कोसळली असता त्या मार्गावरून जाणारी राधाबाई आखाडे यांची गाय या तारांमध्ये अडकली. महापारेषणकडून तातडीने विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला असला तरी, तारांमधील उर्वरित प्रवाहामुळे गायीला बाहेर पडणे कठीण झाले होते. कर्जत पोलिसांनी तातडीने महापारेषणच्या नागोठणे येथील पथकाला पाचारण केले. या पथकाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून गायीची सुखरूप सुटका केली.
महापारेषणच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून गावातून जाणाऱ्या उच्चदाब वीजवाहिनीमुळे सातत्याने धोका निर्माण होत असल्याची तक्रार केली आहे. ही वीजवाहिनी अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आली असून तिची देखभाल आणि तपासणी योग्य प्रकारे होत नसल्याचे ग्रामस्थांनी म्हंटले आहे. टॉवरमधून वारंवार ठिणग्या (जाळ) निघत असल्याने तारांची क्षमता कमकुवत झाली असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, ही लाईन जर एखाद्या व्यक्तीवर किंवा घरावर पडली असती तर मोठा अनर्थ ओढवला असता, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. शासन आणि महापारेषण प्रशासनाने या वीजवाहिनीचे तातडीने पुनर्मूल्यांकन करून सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.