बेघरांच्या मुद्द्यावरून महासभेत खडाजंगी;

बेघरांच्या मुद्द्यावरून महासभेत खडाजंगी;
Published on

बेघरांच्या मुद्द्यावरून महासभेत खडाजंगी
घणसोलीतील निवाऱ्याला सर्वानुमते मुदतवाढ
वाशी, ता. २० (बातमीदार) ः नवी मुंबई शहरातील वाढत्या बेघरांच्या प्रश्नावरून पालिकेच्या महासभेत सोमवारी (ता. २०) खडाजंगी पाहायला मिळाली. घणसोली येथील बेघर निवारा केंद्राच्या व्यवस्थापन व देखभालीसाठी आस्था सामाजिक विकास सेवा संस्थेला पुढील एक वर्षासाठी मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. अखेर सुमारे ४५.७७ लाख रुपयांच्या खर्चासह हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
प्रशासनाच्या मते, घणसोली येथील १०३ खाट क्षमतेच्या निवाऱ्यात सध्या पुरुष, महिला व बालकांसाठी २४ तास सेवा उपलब्ध आहे. लाभार्थ्यांना निवासासह अन्न, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा दिल्या जात आहेत. संबंधित संस्थेचे काम समाधानकारक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. मात्र चर्चेदरम्यान अनेक नगरसेवकांनी शहरातील वाशी, नेरूळ, जुईनगरसह विविध भागांत रेल्वे स्थानके, सिग्नल आणि पूल परिसरात वाढलेल्या बेघरांच्या उपस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असून, काही ठिकाणी चोरी, अमली पदार्थांची देवाणघेवाण आणि इतर गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर विषय असल्याचे सदस्यांनी नमूद केले. नगरसेवक सौरभ शिंदे यांच्या प्रभागातील विषय असल्याने त्यांनी याकडे लक्ष वेधले. या वेळी शिवसेना (शिंदे) गटनेते मनोज हळदणकर यांनी संबंधित संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नव्याने निविदा काढण्याची मागणी केली. एका प्रसंगाचा उल्लेख करीत त्यांनी बेघर महिलेला रात्री उशिरा निवाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आल्याचा अनुभव सांगितला. महापालिका निधी देत असताना संस्थेने अधिक जबाबदारीने व संवेदनशीलतेने काम करणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.

स्वतंत्र धोरण आखण्याची गरज
प्रशासनाने ही योजना न्यायालयाच्या आदेशानुसार राबवली जात असल्याचे स्पष्ट केले. शहरी भागात ठरावीक लोकसंख्येनुसार बेघर निवारे उभारणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. बेघरांच्या प्रश्नावर बोलताना सभागृह नेते सागर नाईक यांनी बेघरांसाठी योग्य उपाययोजना करून स्वतंत्र धोरण आखण्याची गरज सभागृहात अधोरेखित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com