अनधिकृत पार्किंगचा कहर विस्तारीत समर्थ चौक पुन्हा कोंडीत, प्रशासनाकडे कारवाईची मागणी

अनधिकृत पार्किंगचा कहर
विस्तारीत समर्थ चौक पुन्हा कोंडीत, प्रशासनाकडे कारवाईची मागणी
Published on

अनधिकृत पार्किंगचा कहर
विस्तारित समर्थ चौक पुन्हा कोंडीत; प्रशासनाकडे कारवाईची मागणी

बदलापूर, ता. २१ (बातमीदार) ः कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीतील समर्थ चौकाला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर अनधिकृत पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः हेंद्रेपाडा परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सायंकाळच्या वेळी खाद्यपदार्थांचे स्टॉल, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे प्रचंड गर्दी होते. या ठिकाणी येणारे वाहनचालक कोणतेही नियम न पाळता रस्त्यालगत किंवा थेट रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून निघून जातात. परिणामी, रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीचा वेग मंदावतो आणि चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे.

शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी केलेले चौकांचे विस्तारीकरण आणि सुशोभीकरण आता अनधिकृत पार्किंगमुळे पुन्हा निष्प्रभ ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. बदलापूर पश्चिमेतील समर्थ चौक हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक असून, येथून बदलापूर गाव-मुरबाड मार्ग, स्थानकमार्गे अंबरनाथकडे जाणारा मुख्य रस्ता तसेच हेंद्रेपाडा आणि बॅरेज रोडकडून येणारे अंतर्गत रस्ते एकत्र येतात. त्यामुळे येथे सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या पार्श्वभूमीवर कुळगाव-बदलापूर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दूरदृष्टी ठेवत प्रशासकीय काळात चौकाचे रुंदीकरण करून अडथळे दूर केले होते. या उपाययोजनांमुळे काही काळ वाहतूक सुरळीत झाली होती; मात्र सध्या पुन्हा जुन्याच समस्यांनी डोके वर काढले आहे.

यातच चौकात बसवण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेचादेखील परिणाम दिसून येत आहे. सिग्नल सुटताच वाहनचालक पुढील सिग्नल गाठण्यासाठी वेग वाढवतात; मात्र अंतर्गत रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगमुळे अचानक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. पादचाऱ्यांची परिस्थितीही चिंताजनक असून, रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे त्यांना रस्त्यावरूनच चालावे लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती विशेषतः धोकादायक ठरत आहे.
-----------------
अपघातांचे प्रमाण वाढले
स्थानिक नागरिकांच्या मते, ही समस्या केवळ वाहतूक कोंडीपुरती मर्यादित नसून ती सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनली आहे. सायंकाळच्या वेळेत होणाऱ्या कोंडीमुळे रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढल्याचे नागरिक सांगतात. तरीही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कुळगाव-बदलापूर नगरपालिका, वाहतूक पोलिस आणि आरटीओ विभाग यांनी समन्वय साधून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
----------------
अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई, नियमित दंडात्मक मोहीम, ‘नो पार्किंग’ नियमांची कडक अंमलबजावणी, स्टॉलधारकांचे नियमन आणि पर्यायी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, अन्यथा लाखो रुपयांचा खर्च करून केलेले विकासकाम वाया जाऊन समर्थ चौक कायमस्वरूपी वाहतूक कोंडीचे केंद्र बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com