

‘नाथ जल’ बाटली १५ ऐवजी २० रुपयांना
वाडा बसस्थानकात प्रवाशांची लूट; ‘यिन’च्या परिवहनमंत्र्याकडून पाहणी
वाडा, ता. २१ : बसस्थानकात ‘नाथ जल’ पाण्याच्या बाटल्या निर्धारित दरापेक्षा अधिक किमतीत विकल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
भिवंडी ग्रामीण परिसरातील वाडा बसस्थानकात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांच्या दराबाबत गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. परिवहन विभागाची अधिकृत ‘नाथ जल’ ही पाण्याची बाटली शासनाने १५ रुपये एमआरपी निश्चित केलेली असतानाही ती प्रत्यक्षात २० रुपयांना विकली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन विद्यार्थी मंत्री (यिन) सक्षम रामचंद्र जाधव यांनी घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. तपासादरम्यान काही विक्रेते प्रवाशांकडून अधिक दर आकारत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी तसेच विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत जाधव यांनी वाडा आगार व्यवस्थापकांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संबंधित विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित तपासणी आणि नियंत्रण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
पिण्याचे पाणी ही प्रवाशांची अत्यावश्यक गरज असताना, शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा दराने विक्री करणे, हा स्पष्ट नियमभंग आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास विषय उच्च अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाने यावर तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी पुढे येत आहे.
photo : MUM26-F35677
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.