पावसाच्या रिपरिपनंतर पुन्हा प्रखर उष्णतेच्या झळा!

पावसाच्या रिपरिपनंतर पुन्हा प्रखर उष्णतेच्या झळा!
Published on

पावसाच्या रिपरिपीनंतर पुन्हा प्रखर उष्णतेच्या झळा
बेलापूर, ता. २१ (बातमीदार) ः मार्च महिन्यापासून प्रखर उष्णतेने नवी मुंबईसह आजूबाजूच्या नागरिकांना वेठीस धरले आहे. एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा ३५ अंश सेल्सिअस पार झाल्याने उकाड्याने नवी मुंबईकर चांगलेच त्रस्त आहेत. अशातच मंगळवारी (ता. २१) पहाटेपासूनच नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरू झाली. काही काळासाठी आलेल्या पावसानंतर पुन्हा नागरिकांना प्रखर उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
शहरात हवेतील आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा उष्णतेची दाहकता अधिक जाणवत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात पावसाची कोणतीही शक्यता नसून, कोरडे हवामान आणि कडक ऊन अशी स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. मात्र मंगळवारी पहाटेपासूनच नवी मुंबई, पनवेल, पालघर, रायगड, मुंबई या परिसरात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरत मंगळवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, पावसाची रिपरिप सर्वत्र सुरू झाली.

नागरिकांची तारांबळ
मंगळवारी दैनंदिन कामकाजासाठी निघालेल्या नागरिकांना पावसाच्या रिपरिपीचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या पावसामुळे काही नागरिकांनी बस स्थानकाचा आधार घेतला, तर काही नागरिकांनी आपल्या दुचाकी काही वेळासाठी पुलांखाली, आड बाजूला घेत पाऊस थांबण्याची वाट पाहणे पसंत केले. अचानक आलेल्या पावसाने काही वेळासाठी हवेत गारवा निर्माण झाला. मात्र अवघ्या काही वेळातच दमट वातावरणामुळे नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा सुरू झाल्या.

अवकाळी पावसाचे मुख्य कारण म्हणजे वातावरणातील अस्थिरता. हवेतील उष्णतेत झालेली तीव्र वाढ, हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सद्य:स्थितीत राज्यातील बहुतांश भागांत अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे.
- भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com