

अवैध फटाका कारखान्यात स्फोट
वाड्यातील २० वर्षीय कामगाराचा मृत्यू
वाडा, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यातील कोनसई गावातील एका खासगी जागेत पत्र्याचे शेड उभारून अवैध फटाका कारखाना उभारण्यात आला आहे. त्या कारखान्यात आज (ता. २१) प्रचंड मोठा स्फोट होऊन त्यात एका २० वर्षीय कामगाराचा मृत्यू आणि अन्य सहा महिला जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडा तालुक्यातील कोनसई गावातील वसंत नाईक यांच्या मालकीच्या जागेत शेड उभारून नरेंदर सिंग आणि यादव यांनी काही महिन्यांपूर्वी सुतळी बॉम्ब बनविण्याचा कारखाना सुरू केला आहे. या कारखान्यात भावेश वावर (२०) याच्यासह सुमारे ३५ महिला रोजंदारीने काम करीत होत्या. मंगळवारी (ता. २१) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भावेश सुतळी बॉम्बचे मिश्रण तयार करीत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात त्याचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले असून, त्याचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाची माहिती मिळताच पालघरचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, वाड्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. संदीप चव्हाण, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या.
------------
सहा महिला जखमी
वाड्यातील या स्फोटात सहा महिलाही जखमी झाल्या. यातील मोनिका पडवळे (३०) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. याशिवाय मोनिका जाधव (३०), जागृती गवते (२७), प्रतिभा पवार (३०), अर्चना मिसाळ आणि जयश्री गरळ जखमी असून, त्यांच्यावर वाड्यातील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
----------------------------------
असे बनायचे सुतळी बॉम्ब
कोनसई येथील एका लोखंडी शेडमध्ये सुतळी बॉम्बकरिता आवश्यक असलेल्या रासायनिक दारूचे मिश्रण तयार केले जात असे. कामगार आपल्या हाताने ही दारू तयार करीत होते, तर बाजूच्या जागेत अल्पशिक्षित महिला कामगार बॉम्ब बनविण्याकरिता एका डबीत ही दारू भरून सुतळी गुंडाळण्याचे काम करीत होत्या. येथे तयार होणारे सुतळी बॉम्ब तालुक्यातील आबजे आणि निचोळे येथे पॅकिंगकरिता पाठवले जात असत, अशी माहिती महिला कामगारांनी दिली.
----------
स्थानिक प्रशासनाचे अपयश
फटाका कारखाना मागील चार महिन्यांपासून सुरू असताना याची कल्पना स्थानिक पोलिस, संबंधित प्रशासनाला नसणे, हे अपयश आहे. तालुक्यात अशा प्रकारचे विनापरवाना किती कारखाने सुरू आहेत, याबाबतची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचे येथील स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.