मिरा भाईंदरमधील ती चित्रफीत झोंबी ड्रगची नाही - पोलिसांचा निर्वाळा

मिरा भाईंदरमधील ती चित्रफीत झोंबी ड्रगची नाही - पोलिसांचा निर्वाळा
Published on

ती चित्रफीत झोंबी ड्रगची नाही!
मिरा-भाईंदरमधील व्हिडिओवर पोलिसांचे स्पष्टीकरण

भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमध्ये एका व्यक्तीने झोंबी ड्रग घेतले असल्याची चित्रफीत काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर व्हायरल झाली होती. प्रत्यक्षात त्या व्यक्तीने झोंबी ड्रग नाही तर नशेसाठी वेदनाशामक गोळ्यांचे सेवन केले असल्याचा निर्वाळा पोलिसांनी आज दिला आहे.
एक व्यक्ती विचित्र अवस्थेमध्ये एकाच जागी उभा असल्याची चित्रफीत मागील आठवड्यात समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. या व्यक्तीने झोंबी ड्रग घेतल्याचेदेखील त्यात सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर चित्रफितीत दिसून येणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला असता त्याचे नाव समीर राजेंद्र रावल असून तो मूळचा नेपाळचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
रावलच्या चौकशीत त्याला नेपाळमध्ये असल्यापासून मागील दोन वर्षांपासून नशेकरिता ‘प्रेगाबालीन’ नावाच्या वेदानाशामक गोळ्यांचे सेवन करण्याचे व्यसन होते. भाईंदर येथे आल्यानंतर तो नशा करण्यासाठी ‘प्रेगाबालीन’ या गोळीचा शोध घेत असताना त्याला भाईंदर पूर्व येथील एका मेडिकलमध्ये त्या गोळ्या मिळाल्या. या गोळ्या देण्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक असतानाही मेडिकलचालकाने चिठ्ठीशिवाय त्या गोळ्या दिल्या. त्यामुळे तो अधूनमधून त्याच औषधांच्या दुकानातून ‘प्रेगाबालीन’ गोळ्या नशेसाठी घेत होता.
----------------
एकावेळी पाच गोळ्यांचे सेवन
रावलने १३ एप्रिलला नेहमीप्रमाणे ‘प्रेगाबालीन’ गोळ्या खरेदी केल्या. त्यातील पाच गोळ्या एकाच वेळी घेतल्या. यामुळे त्याला चक्कर येऊ लागली व पाऊल पुढे टाकता येत नसल्याने तो एकाच जागी उभा राहिला, असे त्याने पोलिसांना चौकशीत सांगितले; मात्र या गोष्टीचा विपर्यास करून समाजमाध्यमावर त्याने झोंबी ड्रग घेतले असल्याचे जाहीर केल्याने नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण झाले.
----------------
मेडिकलचालक फरार
दरम्यान, पोलिस अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने औषध विक्री दुकानाची पडताळणी करण्यासाठी गेले असताना चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर मेडिकलचालक बाहेरगावी निघून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी ‘प्रेगाबालीन’ गोळ्या बेकायदा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देणाऱ्या मेडिकलचालकावर कारवाई करण्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला पाठवला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com