

बालकर्करुग्णांचे उपचार सोडण्याचे प्रमाण घटले!
२५ टक्क्यांवरून दोन टक्क्यांवर; जागृती, रक्तदान आणि आर्थिक मदतीचा परिणाम
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : बालकर्करुग्णांच्या उपचारांमध्ये अडथळा ठरणाऱ्या विविध समस्यांवर प्रभावीपणे मात केल्याने उपचार अर्धवट सोडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. २००८ मध्ये २० ते २५ टक्क्यांपर्यंत असलेले हे प्रमाण आता केवळ दोन टक्क्यांवर आले असून, जागृती, स्वयंसेवी रक्तदान, आर्थिक मदत आणि सामाजिक आधार व्यवस्थेमुळे हा सकारात्मक बदल शक्य झाला आहे.
‘इम्पॅक्ट’ फाउंडेशनने २००९ ते २०११ दरम्यान सुमारे ३०० कुटुंबांवर केलेल्या सर्वेक्षणातून उपचार सोडण्यामागील महत्त्वाची कारणे स्पष्ट झाली. आर्थिक अडचणींसोबतच अज्ञान हे मोठे कारण ठरले. अनेक कुटुंबे कर्करोग बरा होऊ शकतो, यावर विश्वास न ठेवता झाडफूंक, जादूटोणा, तसेच आयुर्वेद किंवा होमिओपॅथीसारख्या पर्यायी उपचारांकडे वळत होती. काही प्रकरणांमध्ये मुलींबाबत लिंगभेदही आढळून आला.
२००९ पासून ‘सेवा लाइफ’ या उपक्रमाद्वारे रक्त व प्लेटलेट दानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. शाळा, महाविद्यालये आणि कॉर्पोरेट क्षेत्रात स्वयंसेवी रक्तदात्यांची नोंदणी वाढवण्यात आली. परिणामी, पूर्वी ९० टक्के अवलंबित्व रिप्लेसमेंट रक्तदात्यांवर असताना आज ९९ टक्के रक्त व प्लेटलेट्स स्वयंसेवी दानातून उपलब्ध होत आहेत.
दररोज सुमारे २५ जण प्लेटलेट दानासाठी पुढे येत असल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांवरील ताण कमी झाला आहे. याचबरोबर २०१० मध्ये स्थापन झालेल्या ‘इम्पॅक्ट’ फाउंडेशनमार्फत सामाजिक कार्यकर्ते, डेटा व्यवस्थापन आणि रुग्ण सहाय्य यंत्रणा उभारण्यात आली. रुग्ण कुटुंबांना सतत मार्गदर्शन, समुपदेशन आणि मदत दिल्यामुळे उपचारांमध्ये सातत्य राखणे शक्य झाले.
आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी, महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत आणि पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी यांसारख्या योजनांमधून मदत उपलब्ध होत आहे. आता निदानाच्या पहिल्याच दिवसांपासून आर्थिक सहाय्य मिळत असल्याने गरीब कुटुंबांतील मुलांना वेळेवर उपचार मिळणे सुलभ झाले आहे.
दरम्यान, भारतात दरवर्षी ० ते १५ वयोगटातील सुमारे ५० ते ५५ हजार मुलांना कर्करोगाचे निदान होते; मात्र यापैकी केवळ निम्मी मुलेच उपचारासाठी रुग्णालयांपर्यंत पोहोचतात. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये दरवर्षी सुमारे दोन हजार नव्या बालकर्करुग्णांची नोंद होते, ज्यापैकी ८० टक्के रुग्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील आहेत.
वेळेत आणि दर्जेदार उपचार, रक्त व प्लेटलेट्सची उपलब्धता, सामाजिक आधार आणि आर्थिक मदतीमुळे सध्या टाटा रुग्णालयात बालकर्करुग्णांचा बरे होण्याचा दर ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तसेच ‘सर्व्हायव्हरशिप’ कार्यक्रमांतर्गत बरे झालेल्या मुलांचे दीर्घकालीन फॉलोअप, औषधे आणि कृत्रिम अवयवांसाठी मदत दिली जात आहे.
महत्त्वाची कारणे
पूर्वी बालकर्करुग्णांच्या कुटुंबीयांना रक्त व प्लेटलेट्ससाठी स्वतःच दाते शोधावे लागत होते. मुंबईसारख्या शहरात नातेवाईक किंवा ओळखी नसल्यामुळे ही प्रक्रिया कठीण ठरत होती. याशिवाय उपचारांचा वाढता खर्च, राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च यामुळे अनेक कुटुंबे उपचार अर्धवट सोडत होती.
सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे बालकर्करुग्णांच्या उपचारांबाबतचा विश्वास वाढला असून, अंधश्रद्धा आणि अज्ञानावर मात करत उपचार पूर्ण करण्याकडे कुटुंबांचा कल वाढत आहे.
- शालिनी जाटिया,
प्रभारी अधिकारी, इम्पॅक्ट फाउंडेशन, टीएमसी
उपचार सोडण्याची महत्त्वाची कारणे
- रक्त/प्लेटलेट डोनर मिळणे कठीण
- उपचाराचा खर्च, प्रवास व राहणीमान
- अज्ञान व कर्करोगाबाबत गैरसमज
- झाडफूंक, जादूटोणा, पर्यायी उपचारांकडे वळणे
- मुलींबाबत लिंगभेद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.