रस्त्याविना आदिवासी वाड्यांचा संताप उसळला

रस्त्याविना आदिवासी वाड्यांचा संताप उसळला
Published on

रस्त्याविना आदिवासी वाड्यांचा संताप उसळला
वनविभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
कर्जत, ता. २२ (बातमीदार) ः स्वातंत्र्यानंतरही माथेरानच्या डोंगररांगांमधील १३ आदिवासी वाड्या आजही पक्क्या रस्त्याविना अंधारात आहेत. यावरुन प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आदिवासी कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला. या आंदोलनानंतर जाग आलेल्या वनविभागाने ५ मेपर्यंत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
किरवली, उमरोली, आसल आणि माणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आदिवासी वाड्यांमध्ये रस्त्यांची भीषण अवस्था आहे. रस्ता नसल्याने आजारी व्यक्ती, वृद्ध आणि गरोदर महिलांना दवाखान्यात नेण्यासाठी लाकडी दांडक्याला झोळी बांधून डोंगर उतरावा लागतो. अलीकडेच आसलवाडी येथील एका ७८ वर्षीय रुग्णाला अशाच पद्धतीने नेरळला न्यावे लागले होते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलने, उपोषणे व रास्ता रोको केले. मात्र, प्रशासनाकडून ठोस निर्णय झाला नाही. कागदोपत्री प्रक्रियेत रस्ता अडकून पडल्याचे स्थानिकांनी म्हंटले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार (ता. २१) आदिवासी समाजाचे कार्यकर्ते जैतू पारधी आणि गणेश पारधी यांनी कर्जत वनविभाग (पश्चिम) कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देत आंदोलन सुरू केले. त्यांनी प्रत्यक्ष आत्मदहनाची तयारी दर्शवल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

लेखी आश्वासन
या आंदोलनानंतर वनविभागाने आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. संबंधित रस्ता वनजमिनीतून मंजूर असून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी ५ मे २०२६ पर्यंत कार्यवाही करण्यात येईल, असे पत्रात नमूद करण्यात आले. तसेच आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंतीही करण्यात आली.

तीव्र आंदोलनाचा इशारा
वनविभागाच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केले असले तरी, ३० एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, तर १ मे महाराष्ट्र दिनी पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आदिवासी संघटनेचे पदाधिकारी मालू निरगुडे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com