

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : कल्याण पूर्वेतील वालधुनी नदीत रासायनिक पाणी सोडले जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी व वायुप्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे. ठाकरे गट विभागप्रमुख सतीश वायचळ यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडे निवेदन सादर केले आहे. प्रदूषण नियंत्रण अधिकारी उपेंद्र कुलकर्णी, पालिका आयुक्त अभिनव गोयल आणि महापौर हर्षाली चौधरी यांना दिलेल्या निवेदनातून याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
भवानी नगर, अनुपम नगर, घोलपनगर, विधी परिसर, शिव अमृतधाम आणि योगीधाम या भागांतील शेकडो नागरिकांच्या वतीने केलेल्या तक्रारीनुसार, अनेक महिन्यांपासून वालधुनी नदीत रसायनयुक्त पाणी सोडले जात आहे. विशेषतः रात्री ८ ते ११ या वेळेत परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून नदीचे स्वरूप अक्षरशः नाल्यात रूपांतरित झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. निवेदनात संबंधित औद्योगिक कंपनीकडून नदीत सोडले जाणारे दूषित पाणी त्वरित थांबवावे, जबाबदारांवर कठोर कारवाई करावी; तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तत्काळ तपासणी करून सविस्तर अहवाल सादर करावा, अशा ठोस मागण्या केल्या आहेत. यासोबतच परिसरातील हवा व पाण्याची गुणवत्ता नियमित तपासण्याचीही मागणी केली आहे. ही समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा सतीश वायचळ यांच्यासह स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
आरोग्यावर परिणाम
प्रदूषणामुळे हवा व पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये श्वसनाचे त्रास, डोकेदुखी, मळमळ यांसारख्या तक्रारी वाढत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.