आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा -जिल्हाधिकारी

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा -जिल्हाधिकारी
Published on

मान्सूनपूर्व सज्जता
आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा ः जिल्हाधिकारी
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्याची दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि मान्सूनमध्ये उद्भवणारी पूरस्थिती लक्षात घेता, जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय राखून सतर्क राहावे. मान्सूनपूर्व तयारी करताना प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदाऱ्यांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
नियोजन भवन येथे बुधवारी (ता. २२) जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक २०२६चे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, भारतीय तटरक्षक दलाचे अभिषेक कुमार, आपत्ती व्यवस्थापन अधिकार सागर पाठक उपस्थित होते.
जावळे म्हणाले, पावसाळा सुरु होण्याकरिता एक महिन्याचा कालावधी बाकी असून सर्व शासकीय यंत्रणानी अतिधोकादायक व धोक्याची संभावना असलेल्या ठिकाणांची पाहणी करावी. या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित जागी स्थलांतरीत करता यावे यासाठी निवाऱ्याची सज्जता करावी. आपत्ती काळात आपदामित्रांचे सहकार्य खूप महत्वाचे असून ते तात्काळ मदतीला धावून येवून महत्वाची भूमिका बजावत असतात. प्रत्येक विभागांनी आपला नियंत्रण कक्ष २४x७ कार्यान्वित ठेवावा. याकरिता एक समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. जलसंपदा विभागाने आपल्या अखत्यारित असलेली धरणे, मध्यम प्रकल्पांची तपासणी करावी. आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा औषधसाठा, व्हॅक्सिन उपलब्ध ठेवाव्यात. आपत्तीकाळात रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच रायगड पाटबंधारे विभागाने धरणांची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अतिवृष्टी विचारात घेवून टप्प्याटप्याने धरणांतून विसर्ग करावा, अशा सूचनाही जावळे यांनी केल्या.

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख सूचना
सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पूलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी व पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत. तसेच रस्त्यावरील खडे, साईडपट्टी भरुन घेणे, रस्त्यावरील ब्लिंकर्स, बोर्ड, डायव्हर्शनचे बोर्ड, ब्लॅक स्पॉटवर रिफ्लेक्टर्स बसवावेत. सर्व विभागांकडील शोध व बचाव साहित्यांची दुरुस्ती करून सर्व साहित्य सुस्थितीत राहील, याची दक्षता घ्यावी. आवश्यक शोध व बचाव पथक, रुग्णवाहिका, स्थलांतराचे ठिकाण, अन्न पाण्याची व्यवस्था, जेसीबी मशिन्स, वूड कटर्स, बोट, लाईफ जॅकेट, स्पीड बोट, जनरेटर इ. साहित्य व मनुष्यबळ सर्व विभागांनी सज्ज ठेवावेत, असे जावळे यांनी सांगितले.

महाडमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करा
नगरपालिका, महानगरपालिकांनी नालेसफाईची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करावीत. तसेच, महाड शहरात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. अशा पूरपरिस्थितीत मदत कार्य व बचावासाठी आवश्यक पूर्वतयारी व उपाययोजना केली जावी. आपत्तीप्रसंगी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आदी विभागांनी देखील नागरिकांच्या मदत व सुरक्षेच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com