

खत टंचाई टळणार
अनुदानित युरियाच्या गैरवापरावर प्रशासनाची कडक नजर
पनवेल, ता. २२ (बातमीदार) ः आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात रासायनिक खतांची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाने व्यापक नियोजन केले. यानुसार शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा सुनिश्चित करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी तानाजी दोलताडे यांनी दिली आहे.
शासनाकडून जिल्ह्यासाठी एकूण १४ हजार मेट्रिक टन रासायनिक खताचे वाटप झाले आहे. एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत नियोजित साठ्यानुसार खत विक्रेत्यांना टप्प्याटप्प्याने खतांचा पुरवठा केला जाणार आहे. यामुळे हंगामाच्या काळात शेतकऱ्यांना आवश्यक त्या वेळी खत उपलब्ध होणार असून कोणतीही अडचण भासणार नाही, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. याशिवाय, संभाव्य टंचाई टाळण्यासाठी जिल्ह्यात एक हजार १२० मेट्रिक टनांचा संरक्षित साठा राखण्यात येणार आहे. या साठ्यामुळे अचानक वाढलेल्या मागणीला प्रतिसाद देता येईल आणि बाजारात स्थिरता राखली जाईल. जिल्ह्यातील मंजूर वाटप आणि उपलब्ध साठा लक्षात घेता खतांची टंचाई निर्माण होणार नाही, असे स्पष्ट करत प्रशासनाने शेतकऱ्यांना घाईघाईने खत खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच लिंकिंगद्वारे अडवणूक झाल्यास तात्काळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
कठोर कारवाईचा इशारा
अनुदानित युरियाचा शेतीव्यतिरिक्त औद्योगिक वापरासाठी होणारा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत १२ कंपन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवले आहेत. ही मोहीम पुढेही सातत्याने राबवली जाणार आहे. अनधिकृत साठा किंवा युरियाचा गैरवापर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.