लेक लाडकी योजनमुळे मुलींच्या शिक्षणास चालना

लेक लाडकी योजनमुळे मुलींच्या शिक्षणास चालना
Published on

लेक लाडकी योजनेमुळे मुलींच्या शिक्षणास चालना
सहा हजार २८० जणींना लाभ
अलिबाग, ता. २२ (वार्ताहर) : राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे १ एप्रिल २०२३ अथवा नंतर जन्माला येणाऱ्या मुलीसाठी ‘लेक लाडकी’ योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते मार्च २०२६ या कालावधीत एकूण सहा हजार २८० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. या योजनेमुळे आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या कुटुंबांतील मुलींना शिक्षणासाठी मदत होत आहे.
राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्युदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, ११वीत गेल्यावर आठ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये अशा रीतीने एकूण त्या मुलीस एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ देण्यात येतो. शासनामार्फत थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी)द्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येते.
रायगड जिल्ह्यामध्ये जानेवारी २०२४ ते मार्च २०२६ या कालावधीत सात हजार १९८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी एकूण सहा हजार २८० लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ९१८ लाभार्थ्यांना निधी उपलब्ध झाल्यानंतर ताताडीने लाभ देण्यात येणार आहे. सहा हजार २८० लाभार्थ्यांना एकूण तीन कोटी १४ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

चौकट
योजनेसाठी अटी
१. आई किंवा वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
२. १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
३. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल.
४. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.

चौकट
आवश्यक कागदपत्रे
१. लाभार्थी जन्माचा दाखला
२. कुटुंबप्रमुखांचा तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक
३. लाभार्थ्याचे आधार कार्ड
४. पालकांचे आधार कार्ड
५. लाभार्थी आणि माता यांच्या संयुक्त बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
६. रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी छायांकित प्रत
७. अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com