

भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : मिरा-भाईंदरच्या सुधारित विकास आराखड्याला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांचा विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यात जेसल पार्क-घोडबंदर रस्ता, दहिसर-भाईंदर जोडरस्ता व भाईंदर-ठाणे रस्ता रुंदीकरण यांचा समावेश आहे.
मिरा-भाईंदर शहरातून मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणारा सध्या गोल्डन नेस्ट ते काशी-मिरा हा एकमेव मुख्य रस्ता आहे. त्यामुळे वाहतुकीचा संपूर्ण भार या रस्त्यावरच आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून भाईंदर पूर्व येथील जेसल पार्क ते घोडबंदर हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे सध्याच्या गोल्डन नेस्ट ते काशी-मिरा या रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. हा रस्ता एमएमआरडीए बांधून देणार आहे; मात्र त्यासाठी हा रस्ता शहराच्या विकास आराखड्यात दाखवणे आवश्यक होते.
सुधारित विकास आराखड्यात हा रस्ता दाखविण्यात आला आहे; मात्र आराखड्याला मान्यता मिळत नसल्याने या रस्त्यांचे पुढील काम रखडले होते. आता आराखड्याला सरकारने मान्यता दिल्याने रस्त्यांचे काम सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे; मात्र या रस्त्याच्या मार्गात जागोजागी कांदळवन असल्याने विकास आराखड्यात तो उन्नत मार्ग म्हणून दाखविण्यात आला आहे. याव्यतिरिक्त दहिसर-भाईंदर जोडरस्त्यांचा समावेशही आराखड्यात करण्यात आला आहे. घोडबंदर ते ठाणे या सध्याच्या ३० मीटर रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठीदेखील आराखड्यात तो ६० मीटर रुंद दर्शविण्यात आला आहे.
इमारतींच्या पुनर्विकासाला चालना
नव्या एकत्रीकृत विकास नियंत्रण नियमावलीनुसार ९, १२, १५ व १८ मीटर रस्त्यालगत असलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अतिरिक्त चटई क्षेत्रफळ मंजूर होते; मात्र शहरातील अनेक भागातील रस्ते विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेले नसल्याने संबंधित इमारतींना त्याचा लाभ मिळत नव्हता; मात्र सुधारित विकास आराखड्यात ही अट काढून टाकण्यात आली आहे. जो रस्ता वापरात आहे; मात्र तो विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेला नाही. असा रस्तादेखील यापुढे गृहीत धरण्यात यावा, असे आराखड्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्याचा इमारतींच्या पुनर्विकासासाठी मोठा फायदा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.