

अलिबागच्या पर्यटनवृद्धीला चालना
मांडवा येथे उभारणार ‘मरिना प्रकल्प’; आराखडा तयार करण्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
अलिबाग, ता. २२ (वार्ताहर) ः अलिबाग तालुका पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. तालुक्यात दाखल होणारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त पर्यटक हे जलमार्गाने अलिबागमध्ये दाखल होत असतात. त्यामुळे मांडवा येथे लवकरच ‘मरिना प्रकल्प’ उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १,५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या आठ दिवसांत या प्रकल्पाचा आराखडा तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अलिबाग तालुक्यात येण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात जलमार्गाचा अवलंब करीत असतात. त्याचप्रमाणे अनेक स्थानिक कर्मचारीही दररोज याच मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे प्रवासी जलवाहतूक करणाऱ्या बोटी, स्पीडबोटी, रो-रो, अनेक स्थानिकांच्या बोटी येथे किनाऱ्यावर शाकारलेल्या असतात; मात्र मांडवा परिसरात सध्या बोटी उभ्या करण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने भरती-ओहोटीच्या काळात मोठ्या अडचणी निर्माण होतात. वाढते पर्यटन आणि तालुक्याचा विकास लक्षात घेता जेट्टीजवळ मरिना प्रकल्प उभारण्याची मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन मंत्री राणे यांनी मंगळवारी (ता. २१) मंत्रालयात विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मांडवा येथील मरिना प्रकल्प उभारणीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. अखेरीस अत्याधुनिक मरिना प्रकल्प उभारण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला.
राणे यांनी या प्रकल्पाचा आराखडा तातडीने तयार करून पुढील १५ दिवसांत कामाची निविदा निघाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिले. मांडवा येथे मरिना प्रकल्प उभारण्यात आल्यास छोट्या प्रवासी बोटी, यॉट्स आणि लहान जहाजांसाठी सुरक्षित बंदर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पर्यटन, रोजगारनिर्मिती, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. तसेच पायाभूत सुविधांचा विकास होऊन मांडवा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बंदर म्हणून ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे.
मांडव्याचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व अधिक
मांडवा जेट्टीवरून सुरू असणारी रो-रो सेवा तसेच इतर प्रवासी जलवाहतूक यामुळे मांडव्याला पर्यटनाच्या दृष्टीने अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याठिकाणी अनेक मोठमोठे काॅटेजेस असून स्थानिकांनाही यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून मांडवा हा जलमार्गाने होणारा प्रवास कमी खर्चिक व वेळ वाचविणारा असल्याने पर्यटन हंगामाव्यवतिरिक्त इतर वेळीही हजारोंच्या संख्येने पर्यटक जलमार्गाला पसंती देतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यातही रो-रो सेवा सुरू असल्याने पर्यटकांना सोयीचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे मांडवा जेट्टीचे पर्यटनदृष्ट्या अधिक महत्त्व आहे.
‘मरिना’ म्हणजे काय?
‘मरिना’ म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरचा मिनी टुरिस्ट हब, जिथे बोटी थांबतात. पर्यटक येतात. हॉटेल, दुकाने असतात. यामुळे स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होतो. ‘मरिना’ झाल्यानंतर अलिबाग, मांडवा भागातील पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. बोट ट्रान्स्पोर्ट आणि वॉटर स्पोर्ट्सला चालना मिळणार आहे.
अलिबाग, मुरूडमध्ये सध्या वाढते पर्यटन आणि नागरिकीकरण लक्षात घेत पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. यासोबतच मांडवा बंदराला आंतरराष्ट्रीय स्तरावरील बंदर म्हणून ओळख मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. या मरिना प्रकल्पामुळे येथे रोजगार निर्मिती होण्यासही मदत होणार आहे.
- महेंद्र दळवी, आमदार, अलिबाग-मुरूड मतदारसंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.