

शिशू स्तनपान केंद्रांची दयनीय अवस्था
कुर्ला स्थानक ठरतेय दुर्लक्षाचे केंद्र; स्वच्छतेचा अभाव, तुटलेली साधनसामग्री, मातांचा रोष वाढला
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : महिलांसाठी अत्यंत गरजेची मानली जाणारी शिशू स्तनपान केंद्रे मुंबईतील रेल्वे स्थानकांवर केवळ कागदोपत्रीच असल्याचे वास्तव समोर येत आहे. प्रवाशांची प्रचंड वर्दळ असलेल्या कुर्ला स्थानकावर या सुविधेची झालेली दुर्दशा हेच चित्र स्पष्ट करते.
कुर्ला पश्चिमेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील तिकीट खिडकीजवळ असलेले स्तनपान केंद्र पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत असून, धुळीने माखलेले आहे. केंद्राच्या बाहेर कचरा साचलेला असून, अस्वच्छतेमुळे तीव्र वास पसरलेला आहे. परिणामी या केंद्राचा वापर करणे तर दूरच, तिथे काही क्षण थांबणेही महिलांसाठी अस्वस्थ करणारे ठरत आहे.
रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी महिलांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही स्तनपान केंद्रे मोठा गाजावाजा करीत सुरू केली होती. प्रत्यक्षात त्यांच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसते. कुर्ल्यासारख्या महत्त्वाच्या आणि गर्दीच्या स्थानकावर अशी अवस्था असेल, तर इतर स्थानकांवरील परिस्थिती किती बिकट असेल याची कल्पना करता येते.
दादर, डोंबिवली, कल्याण यांसारख्या प्रमुख स्थानकांवरही ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परंतु तिथेही तुटलेली दारे-खिडक्या, बंद पाण्याची व्यवस्था, अंधारलेली खोली आणि असुरक्षित वातावरण यामुळे अनेक माता या केंद्रांकडे जाणे टाळत आहेत. त्यामुळे महिलांना सार्वजनिक ठिकाणीच लहान बाळांना स्तनपान करावे लागते. यामुळे त्यांच्या सन्मान आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.
केंद्रे नेमकी कुठे?
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेले स्टॉल स्थानकांवर ठळकपणे दिसतात आणि त्याची जाहिरातही मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र मातांसाठी अत्यावश्यक असलेल्या स्तनपान केंद्रांची माहिती देणारे फलक किंवा दिशादर्शक चिन्हे अनेक ठिकाणी आढळत नाहीत. त्यामुळे ही केंद्रे नेमकी कुठे आहेत, हेच अनेक महिलांना समजत नाही.
नियमित स्वच्छता, सुविधांची मागणी
महिलांचे आरोग्य, सन्मान आणि सुरक्षिततेशी थेट संबंधित असलेली ही सुविधा केवळ नावापुरती राहिल्याने प्रवासी आणि महिला संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांनी या केंद्रांची तातडीने दुरुस्ती करून नियमित स्वच्छता, सुरक्षा आणि देखभाल सुनिश्चित करावी, स्पष्ट दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
लोकलमधील गर्दी इतकी वाढली आहे की धडधाकट माणसांनाही चढताना विचार करावा लागतो. अशा परिस्थितीत लहान बाळाला घेऊन आईने कसा प्रवास करावा, हा मोठा प्रश्न आहे. स्तनपानासाठी सुविधा निर्माण केल्या असल्या तरी त्यांची देखभाल होत नसल्याचे कुर्ला स्थानकावर स्पष्ट दिसते.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ
मी काही दिवसांसाठी मुंबईत आले होते. माझे दीड वर्षाचे बाळ आहे. मला कोणत्याही स्थानकावर ‘हिरकणी कक्ष’ सहज दिसला नाही. प्रत्येक स्थानकावर असे कक्ष असणे आवश्यक असून, ते स्पष्टपणे दिसतील अशा ठिकाणी असायला हवेत.
- मयूरी सर्वेश सावंत, माता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.