

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : साडेबारा हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो (रिंग रेल्वे) प्रकल्पावरून ठाण्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी या प्रकल्पाच्या गरजेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अंतर्गत मेट्रोच्या नावाखाली ठाणेकरांच्या पैशांची लूट का? असा थेट सवाल उपस्थित केला आहे. अंतर्गत मेट्रोवर हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा टीएमटी सक्षम करण्यावर भर द्या, असा सल्लाही प्रधान यांनी दिला.
प्रस्तावित रिंग रेल्वे प्रकल्प बॅरिस्टर नाथ पै मार्ग, हिरानंदानी इस्टेट आणि बाळकूममार्गे ठाणे रेल्वे स्थानकाला जोडणार आहे. एवढ्या मोठ्या खर्चाचा हा प्रकल्प प्रत्यक्षात किती आवश्यक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हावा, असे मत प्रधान यांनी व्यक्त केले. या प्रकल्पासाठी होणाऱ्या खर्चातून एक हजार कोटी रुपये परिवहन व्यवस्थेला दिले, तर ठाणे महानगर परिवहन (टीएमटी) सक्षम होऊन शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊ शकते. सध्या बॅरिस्टर नाथ पै मार्गावर प्रवास करताना तीन-तीन सिग्नल पार करावे लागतात. आधीच सुरू असलेल्या मेट्रो कामांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. नव्या प्रकल्पामुळे कोंडीत आणखी भर पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
जमीन अधिग्रहणाला विरोध
कारशेडसाठी ४४ एकर जमीन अधिग्रहित करण्याच्या निर्णयालाही शेतकऱ्यांचा विरोध आहे. ठाणेकर शेतकऱ्यांना भूमिहीन करून कसला विकास साधणार? असा प्रश्न प्रधान यांनी उपस्थित केला.
आर्थिक व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह
प्रकल्पासाठी ३७ टक्के निधी कर्जाच्या स्वरूपात उभारणार असल्याचे सांगत प्रधान यांनी आर्थिक व्यवहार्यतेवरही प्रश्न उपस्थित केले. सरकारकडे आधीच निधीची कमतरता आहे. उर्वरित ६३ टक्के रक्कम कुठून आणणार आणि घेतलेले कर्ज कसे फेडणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
.....................................
हिरवळ, स्वच्छ हवा धोक्यात
आनंदनगर ते साकेतदरम्यान रस्ते कामांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. याशिवाय, रिंग रेल्वे प्रकल्पासाठी आणखी तीन हजार झाडे तोडण्यास परवानगी आहे. यात ठाण्याची ओळख असलेली हिरवळ आणि स्वच्छ हवा धोक्यात आली आहे, अशी खंत प्रधान यांनी व्यक्त केली. जोपर्यंत ठाणेकर नागरिक रस्त्यावर उतरून विरोध करत नाहीत, तोपर्यंत अशा हजारो कोटींच्या योजना राबवल्या जातील, असे म्हणत त्यांनी नागरिकांना जागरूक होण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.