

उन्हाच्या कडाक्यात पुन्हा माठाचा थाट
नवी मुंबईत पारंपरिक मातीच्या भांड्यांची वाढती मागणी; पर्यावरणपूरक पर्यायाकडे नागरिकांचा कल
नवी मुंबई, ता. २२ (बातमीदार) : एप्रिल-मे महिन्याच्या वाढत्या उष्णतेमुळे नवी मुंबईकर पारंपरिक उपायांकडे वळताना दिसत आहेत. थंडगार पाण्यासाठी मातीचे माठ, सुरई आणि आकर्षक डिझाइनच्या मातीच्या बाटल्यांची मागणी शहरात वाढली आहे. विविध भागांतील मातीच्या वस्तू विक्री केंद्रांवर ग्राहकांची गर्दी वाढत असून, विक्रेत्यांनाही यंदा चांगली कमाई होत आहे.
साध्या माठापासून ते नक्षीकाम केलेल्या रंगीबेरंगी बाटल्यांपर्यंत अनेक पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. साध्या माठांची किंमत सुमारे २५० रुपयांपासून सुरू होत असून, डिझाइन व आकारानुसार ती ८०० ते १,००० रुपयांपर्यंत जाते. किमती वाढल्या असल्या तरी मागणीत कोणतीही घट झाली नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे मातीच्या बाटल्यांना तरुणांकडून मोठी पसंती मिळत आहे. अनेक जण या बाटल्यांवर स्वतः रंगकाम करून त्यांना वैयक्तिक स्पर्श देत आहेत. प्लॅस्टिकला पर्याय आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार यामुळे मातीच्या वस्तूंचा वापर वाढत असल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे. गच्ची, बाल्कनी किंवा झाडांवर ठेवण्यासाठी लहान मातीची भांडी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहेत. सोसायट्यांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणीही पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली जात आहे.
फ्रीजमधील अति थंड पाण्यापेक्षा माठातील पाणी अधिक आरोग्यदायी असल्याने नागरिक त्याला प्राधान्य देत आहेत. नैसर्गिक थंडावा आणि मातीचा सौम्य स्वाद यामुळे माठ पुन्हा घराघरात स्थान मिळवत आहे.
चौकट
आरोग्यासाठी वरदान
माठातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते. मातीच्या सूक्ष्म छिद्रांमुळे पाण्याचे तापमान संतुलित राहते. यामुळे ते पचनासाठी लाभदायक ठरते. तसेच अति थंड पाणी पिण्यामुळे होणाऱ्या घशाच्या व पचनाच्या तक्रारी टाळण्यासाठी माठातील पाणी उपयुक्त मानले जाते. त्यामुळेच आरोग्यदायी आणि नैसर्गिक पर्याय म्हणून माठांचा वापर पुन्हा वाढताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.