

मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला
हंगामी फळ-भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर
रोहा, ता. २२ (बातमीदार) : रोहे शहरातील आडवी बाजारपेठ, तीन बत्ती नाका आणि मुख्य रस्त्यालगत हंगामी फळ व भाजी विक्रेत्यांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी अखेर सुटली आहे. अनेक वर्षांपासून या भागात विक्रेते रस्त्याकडेला व्यवसाय मांडत असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. बाजारपेठेतून मार्ग काढणे कठीण बनले होते.
या पार्श्वभूमीवर रोहा नगरपालिकेने पुढाकार घेत सर्व हंगामी विक्रेत्यांचे नियोजनबद्ध स्थलांतर केले. जैन मंदिरासमोरील नाझ स्टोअरच्या मागील मोकळ्या जागेत, आरक्षण क्र. २१मध्ये त्यांना तात्पुरती व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी शेड व पीसीसी सुविधा देऊन ऊन, पावसापासून संरक्षणाची सोय करण्यात आली आहे. जवळपास ३० वर्षे पडून असलेली ही जागा स्वच्छ करून उपयुक्त करण्यात आली आहे.
नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांनी विक्रेत्यांना पुढील काळात टप्प्याटप्प्याने सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शासन निधी मिळाल्यानंतर येथे सुसज्ज भाजी मार्केट उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
चौकट
वाहतूक व सुरक्षिततेला दिलासा
या उपक्रमामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी झाली असून, विक्रेत्यांचीही सुरक्षितता वाढली आहे. ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व भाजीपाला व फळे उपलब्ध होत असल्याने खरेदी सोईस्कर झाली आहे. शहरातील शिस्त, सुव्यवस्था आणि दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापनासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.