

निष्काळजीमुळे चिमुकल्याचा बळी!
दोषींवर गुन्हा दाखल करण्याची भूमिपुत्र एल्गार संघटनेची मागणी
भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) ः वेळेवर वैद्यकीय उपचार व रुग्णवाहिका न मिळाल्याने आदिवासी महिलेची घरातच प्रसूती होऊन बाळ गमावण्याची वेळ आली. ही घटना भिवंडी तालुक्यातील मैंदे बीजपाडा या आदिवासी पाड्यात घडली. याप्रकरणी भूमिपुत्र एल्गार संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेने बुधवारी दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देत वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकरणात दोषी असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील मैंदे बीजपाडा या आदिवासी पाड्यातील महिला सविता विनोद रावते (३२) मंगळवारी रात्री प्रसूतीकळा येऊ लागल्याने तिच्या कुटुंबाने वारंवार संपर्क करूनही आरोग्य विभागाने गाडीची व्यवस्था केली नाही. खराब रस्ता आणि वाहनाची अनुपलब्धता यामुळे या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचता आले नाही. त्यामुळे तिने घरातच बाळाला जन्म दिला. मात्र वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले नसल्याने बुधवारी सकाळी नवजात बाळाचा मृत्यू झाला.
सविता रावते या वीटभट्टी मजूर असून, मागील नऊ महिन्यांच्या काळात त्यांची एकदाही सोनोग्राफी झाली नाही. सविता यांच्याकडे स्वतःचे आधार कार्ड आहे. मात्र त्यांच्या पतीचे आधार कार्ड नसल्याचे तांत्रिक कारण देत आरोग्य विभागाने त्यांना तपासणीपासून वंचित ठेवल्याचा आरोप भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी केला. संबंधित दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही, असा इशारा प्रमोद पवार यांनी दिला.
चार तपासण्या केल्या
सविता विनोद रावते या महिलेच्या गरोदरपणाची नोंद दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेली होती. त्यांच्या चार तपासण्या केल्या होत्या. प्रसूती तारीख २० मे ही दिली होती. सोनोग्राफी येथे होत नसल्याने फक्त आम्ही चिठ्ठी दिली होती. आधार कार्डची मागणी प्राथमिक आरोग्य केंद्रात केली नव्हती. हे मूल एक महिना वेळेआधी जन्माला आले. यानंतर दुपारी मृत बाळाला घेऊन महिला आरोग्य केंद्रात आली होती, अशी माहिती दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिकेत ढाकणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.