मणिपूर सालकरपाड्यातील रस्ता खुला करण्याची मागणी

मणिपूर सालकरपाड्यातील रस्ता खुला करण्याची मागणी
Published on

मार्ग मोकळा करण्याची मागणी
रस्ता बंद असल्याने विद्यार्थी, शेतकऱ्यांची गैरसोय

कासा, ता. २३ (बातमीदार) : मणिपूर येथील सालकरपाडा परिसरातील वहिवाटीचा रस्ता एका व्यक्तीने अडवला असून, तो बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सदर रस्ता तातडीने पूर्ववत खुला करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी, तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, डहाणू यांनी मंडळ अधिकारी, आशागड यांना घटनास्थळी चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामस्थांच्या निवेदनानुसार, मणिपूर येथील जुना वहिवाटीचा रस्ता रामजी सालकर यांनी बंद केला आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेकडून दुरुस्त करण्यात आला असून, सालकरपाडा परिसरातील शेतजमिनींकडे जाण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तो एकमेव मार्ग आहे.

रस्ता बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे कठीण झाले आहे. तसेच घरकुल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांसाठी लागणारे साहित्य, जसे की, विटा, सिमेंट आदींची वाहतूक करण्यातही अडथळे निर्माण होत आहेत. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांसाठीही हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, शेतमाल वाहतुकीसाठी ही तोच प्रमुख मार्ग आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर अतिक्रमण करून तो बंद करणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
---------------------
चौकशी प्रक्रिया सुरू
सध्या धर्मा सालकर यांनी सोमवारी (ता. २०) तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला असून, त्यानंतर प्रशासनाने चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. मंडळ अधिकारी, आशागड यांना संबंधित कागदपत्रे, पंचनामा व अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून बंद करण्यात आलेला रस्ता खुला करावा आणि विद्यार्थ्यांसह शेतकरी व ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com