अनेक नगरसेवक ‘बिल्ला’विना

अनेक नगरसेवक ‘बिल्ला’विना
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे महापालिका सभागृहात पक्षचिन्ह लावून सदस्य येत असल्याने, त्यावर सत्ताधारी पक्षातील शिंदे सेनेने पक्षीय जोडे बाहेर ठेवून सभागृहात यावे, असा टोला मित्रपक्ष भाजपला लगावला होता. त्यानंतर महापौर आणि पालिका आयुक्तांनी नुकतेच महासभेत ‘नगरसेवक’ अशा अधिकृत बिल्लाचे सर्व नगरसेवकांना वाटप केल्याने पक्षचिन्ह वादावर पडदा पडल्याचे बोलले जात होते. असे असताना अनेक सदस्य बुधवारी झालेल्या महासभेत पक्षचिन्हांसह उपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
महापालिका निवडणुकांनंतर २३ फेब्रुवारीला झालेल्या पहिल्या महासभेतच या मुद्द्याला सुरुवात झाली होती. त्या वेळी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांनी, भाजप नगरसेवक पक्षचिन्ह लावून सभागृहात आल्याबद्दल आक्षेप घेत, सभागृहात येताना पक्षीय जोडे बाहेर ठेवून यावे, असा टोला लगावला होता. त्यानंतर काही काळ भाजप नगरसेवकांनी पक्षचिन्ह न लावता कामकाजात सहभाग घेतला. मात्र, महासभा सुरू होण्यापूर्वी शिंदे गटाच्या नगरसेवकांना ‘धनुष्यबाण’ चिन्हाचे वाटप झाले. यावर भाजप नगरसेवकांनी, आम्हाला पक्षचिन्ह लावू नका असे सांगतात आणि तुम्ही चिन्ह लावून येतात, अशी मिश्किल टोलेबाजी केली. यानंतर भाजपच्या नगरसेवकांनाही ‘कमळ’ चिन्ह वितरित करण्यात आले. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपत सुरू असलेल्या शीतयुद्धाची चर्चा सभागृहात रंगू लागली.
या शीतयुद्धावर पडदा पडावा, यासाठी सोमवारी (ता. २०) झालेल्या महासभेत महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि पालिका आयुक्त सौरभ राव यांनी युक्ती लढवली. विधानसभा आणि विधान परिषदेत आमदारांना बिल्ला देण्यात येत असतो, त्याप्रमाणे ठाणे पालिकेतील सदस्यांसाठी ‘नगरसेवक’ असा अधिकृत बिल्लाचे अनावरण करून त्यांना वाटप केले. विधानमंडळाप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही एकसमान ओळख निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता. मात्र, त्यानंतरही बुधवारी झालेल्या महासभेत अनेक सदस्यांनी बिल्लाअभावी पक्षचिन्ह लावूनच सभागृहात उपस्थित राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे ‘बिल्ला विरुद्ध पक्षचिन्ह’ हा वाद अजूनही संपलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com