

टिटवाळा, ता. २३ (वार्ताहर) : शहरातील पाळीव प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने तातडीने स्पष्ट नियमावली जाहीर करावी, अशी मागणी बोधामृत सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे संचालक श्याम उबाळे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली. पाळीव प्राण्यांविषयी आक्षेप नसला, तरी त्यांच्या देखभालीतील निष्काळजीमुळे इतर नागरिकांना त्रास होत आहे. यासंदर्भात महापालिकेकडे कोणतीही ठोस नियमावली किंवा धोरण नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भटके कुत्रे व मांजरांच्या वाढत्या उपद्रवाबाबत यापूर्वीही महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने आणि आरोग्य विभागाकडून प्राप्त उत्तरात ‘धोरण विचाराधीन आहे’ असे नमूद केल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. सध्या पाळीव प्राण्यांबाबत कोणतीही परवाना प्रणाली किंवा दंडात्मक कारवाई नसल्याचे चित्र आहे.
झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या शहरात पाळीव व भटक्या प्राण्यांबाबत स्पष्ट धोरण, नियमावली आणि कडक अंमलबजावणी आवश्यक असल्याचे उबाळे यांनी नमूद केले. महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने याकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांचा रोष तीव्र होण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्राणीमालकांकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष
अनेक प्राणीमालक प्राण्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसल्याने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता वाढत आहे. प्राण्यांना फिरायला आणताना त्यांच्या विष्ठा व मलमूत्राची योग्य विल्हेवाट न लावल्याने दुर्गंधी व आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच, आजारी प्राण्यांचे नियमित लसीकरण व उपचार न केल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. यामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.