

भिवंडी, ता. २३ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण होत असून अपघातांची भीती वाढली आहे. यासाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नारायण चौधरी यांनी संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे केली आहे.
शहरातील विविध प्रभागांमध्ये प्रमुख मार्गांसह उपमार्गांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खोल खड्डे पडले आहेत. काही भागांत डांबर पूर्णपणे निघून गेल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच पादचाऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. महापालिकेकडून दरवर्षी ई-निविदा प्रक्रियेद्वारे रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदारांना सोपविली जातात. निविदा अटींनुसार ही कामे निश्चित कालावधीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात अनेक ठेकेदारांकडून कामकाजात दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे. ‘डांबर उपलब्ध नसणे’ यांसारखी कारणे देत रस्ते दुरुस्तीची कामे प्रलंबित ठेवली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर चौधरी यांनी आयुक्त सागर यांना पत्र देत संबंधित ठेकेदारांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. कामकाजात निष्काळजीपणा, टाळाटाळ आणि निविदा अटींचे उल्लंघन सहन केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी, तसेच अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. भविष्यातील रस्ते दुरुस्तीच्या ई-निविदांमध्ये अशा अकार्यक्षम ठेकेदारांना अपात्र ठरवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींमुळे महापालिकेतील तथाकथित ‘ठेकेदार राज’वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही नागरिकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत.
ठेकेदारांना इशारा
महापौरांनी यापूर्वीही रस्ते दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने ही बाब अधिकच गंभीर बनली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, संबंधित ठेकेदारांनी कोणतेही कारण न देता तत्काळ कामाला सुरुवात करून निर्धारित कालावधीत ते पूर्ण करावे; अन्यथा त्यांच्यावर निविदा अटींनुसार कारवाई करावी, असा इशाराही देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.